महिला दिनानिमित्त सरकार देणार गिफ्ट; महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बँक खात्यात जमा होणार फेब्रुवारीचा हप्ता – आदिती तटकरे

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्चमध्ये मिळणार आहे. ८ मार्च रोजी, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तसेच, लाडक्या बहिणींना २,१०० रुपये मिळण्याच्या निर्णयावर लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाडक्या बहिणींना महिना १,५०० रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार, जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांचा हप्ता पात्र महिलांना मिळाला. विधानसभा निवडणुकीनंतर, महायुती सरकारने या रकमेचा वाढ करण्याची घोषणा करत ती २,१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले. मात्र, २,१०० रुपयांचा हप्ता कधी जमा होणार, याबाबत अजूनही स्पष्टता नव्हती. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे दिल्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता रखडल्याची चर्चा सुरू होती. अखेर, मंत्री आदिती तटकरे यांनी हा हप्ता ८ मार्च रोजी मिळणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे.

योजनेतून ८० लाख महिलांना वगळले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र, आतापर्यंत २ कोटी ४० लाख पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. नियमांत बसणाऱ्या सर्व महिलांना ही मदत मिळत राहील आणि योजना बंद होणार नाही, असा सरकारचा स्पष्ट संदेश आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत महिलांना १,५०० ऐवजी २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिन्ही पक्षांचे नेते याबाबत निर्णय घेतील, असे तटकरे यांनी सांगितले

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *