आषाढी वारीसाठी 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपयांचे अनुदान जाहीर

पंढरपूर: आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपयांचे अनुदान देण्याचा शासन आदेश (GR) नुकताच जारी करण्यात आला आहे. यामुळे वारीच्या आयोजनाला आणि वारकऱ्यांना मोठा हातभार लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिंड्यांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी वारकरी संप्रदायातून होत होती. या मागणीचा विचार करून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या अनुदानामुळे दिंड्यांना वारीदरम्यान येणाऱ्या विविध खर्चांची, जसे की भोजन, आरोग्य सुविधा, निवास आणि इतर व्यवस्थापन यासाठी मदत होणार आहे.

मागील वर्षी (2024) तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन 2024 करिता मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला रु.20,000 इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत निदेश दिले होते. सन 2023-24 मध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाला एकूण 1109 दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. त्यानुसार गतवर्षीप्रमाणे यंदादेखील तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी रु.20,000 रुपये याप्रमाणे एकूण 2,21,80,000 रुपये इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी 20,000 रुपये अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची एक अद्वितीय परंपरा असून, लाखो वारकरी शेकडो किलोमीटर चालून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. या वारीचे सुव्यवस्थित आयोजन आणि वारकऱ्यांची सोय यासाठी हे अनुदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे वारकरी संघटना आणि भाविकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *