संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव) आळंदी नगरीत भव्य दिव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रमुख पाहुणे म्हणून अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. हा महोत्सव ३ मे ते १० मे २०२५ दरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व आळंदी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे. या विशेष सोहळ्यात ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या कीर्तनांचे कार्यक्रम, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रांचे चिंतन, ज्ञानेश्वरीवर प्रवचने, सामूहिक हरिपाठ, संगीत सेवा, भारूड आणि इतर सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आलेल्या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झाला असून, त्यांच्या उपस्थितीबाबत अंतिम निर्णय लवकरच त्यांच्या कार्यालयाकडून जाहीर होणार आहे. त्यांच्या उपस्थितीची तारीख व वेळ निश्चित झाल्यानंतर इतर मान्यवर पाहुण्यांची यादीही अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल. या महोत्सवासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड येथील क्रांतीकारक चाफेकर बंधूंच्या वाड्याचा पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास गेला असून, एप्रिल महिन्याच्या मध्यात पंतप्रधान मोदी यांचा पिंपरी-चिंचवड दौरा निश्चित आहे. या दौऱ्यातच आळंदीतील कार्यक्रमाच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती संस्थानचे प्रमुख योगी निरंजननाथ महाराज यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या केवळ २१व्या वर्षी, इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. त्यामुळे आळंदी हे वारकरी संप्रदायासाठी अत्यंत श्रद्धास्थान बनले असून, पंढरपूरनंतर हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. अशा या पवित्र भूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होणे, ही वारकरी संप्रदायासाठी अत्यंत गौरवाची आणि ऐतिहासिक बाब ठरणार आहे. या संत परंपरेच्या तेजस्वी वैभवाला उजाळा देणारा आणि देशभरातील भाविकांना एकत्र आणणारा हा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव अध्यात्म, संस्कृती आणि भक्तीचा अपूर्व संगम ठरेल, याबाबत निश्चितता व्यक्त केली जात आहे.
संतांनी आळंदीचे महात्म्य वर्णन करताना लिहिले आहे –
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्वर ॥१॥
चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । तो सुख सोहळा काय वर्ण ॥२॥
विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव | स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥
नामा म्हणे देवा चला तया ठाया । विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४॥
हा महोत्सव केवळ श्रद्धेचा उत्सव न राहता, संतांची शिकवण आणि वारकरी चळवळीचा मूलगामी संदेश संपूर्ण देशभर पोहोचविणारा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे.
Leave a Reply