नवी मुंबई : भारताच्या पायाभूत विकास क्षेत्रातील एक ऐतिहासिक पाऊल म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आला. अंदाजे ₹19,650 कोटी खर्चून उभारण्यात आलेले हे विमानतळ आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक रचना आणि अत्याधुनिक सुविधा यासाठी विशेष ठरणार आहे.
भारताचा पहिला ‘पूर्णपणे डिजिटल’ विमानतळ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस विमानतळ आहे. प्रवाशांना ऑनलाइन चेक-इन, डिजिटल इमिग्रेशन, स्मार्ट बॅगेज ड्रॉप, तसेच वाहन पार्किंगचे प्री-बुकिंग यांसारख्या सुविधा मिळतील. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व फेस-रिडग्निशन तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा संपूर्ण प्रवास “contact-less” व जलद होईल.
पायाभूत सुविधा आणि क्षमताशीलता
पहिल्या टप्प्यात एक रनवे आणि एक टर्मिनल उभारले गेले असून, या टप्प्यात दरवर्षी २ कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. डिसेंबर २०२५ पासून येथे उड्डाण सेवा सुरू होण्याची शक्यता असून, सुरुवातीला दर तासाला सुमारे १० उड्डाणे होतील. आगामी काही महिन्यांत ती संख्या वाढवून ४० उड्डाणे प्रति तास इतकी करण्याचा विचार आहे.
पर्यावरणपूरक व हवामानसज्ज रचना
या विमानतळाची रचना जागतिक ख्यातनाम जाहा हदीद आर्किटेक्ट यांनी केली आहे.
संपूर्ण प्रकल्पात पावसाचे पाणी साठवण, सौरऊर्जा वापर, वादळ-सहनशील बांधकाम आणि हरितक्षेत्र यावर विशेष भर देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे विमानतळ अत्यंत प्रतिकूल हवामानातही कार्यरत राहील अशा प्रकारे बांधले गेले आहे.
आर्थिक आणि सामाजिक परिणाम
या विमानतळामुळे मुंबईच्या विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. याशिवाय, पनवेल, उलवे, तळोजा आणि खारघर परिसरात रिअल इस्टेट बाजारात तेजी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असे सरकारचे म्हणणे असले तरी या वचनांची अंमलबजावणी कितपत होईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नाव आणि राजकीय पार्श्वभूमी
उद्घाटनापूर्वी या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोर धरली होती. सरकारने या मागणीचा सन्मान राखत विमानतळाच्या प्रवेशद्वारावर “लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ” असा फलक उभारल्याचे समजते.
भविष्याचा हवाई केंद्रबिंदू
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशात हवाई वाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल.
हा विमानतळ भारतातील सर्वात आधुनिक, डिजिटल आणि पर्यावरणपूरक विमानतळ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Leave a Reply