राज्यातील गोवंश संवर्धनासाठी महत्त्वाच्या ‘देशी गोवंश परिपोषण योजने’ अंतर्गत ५६० गोशाळांना २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अनुदानाचे वितरण झाले. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे अनुदान ५६० गोशाळांमधील ५६,५६९ गायींसाठी वितरित करण्यात आले. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून २५ कोटी ४५ लाख ६० हजार ५०० रुपये थेट गोशाळांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशी गोवंश संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगत, महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्याचे कौतुक केले. या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच, अधिकाधिक गोशाळांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आयोगाच्या सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही आयोगाच्या कार्याचा गौरव करत देशी गोवंश संवर्धनासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरेल, असे मत व्यक्त केले.
गोवंश परिपोषण योजनेचा लाभ कसा मिळतो?
राज्यातील नोंदणीकृत गोशाळांमध्ये असलेल्या देशी गायींच्या संगोपनासाठी सरकारकडून प्रति गाय प्रतिदिन ५० रुपये अनुदान दिले जाते.
अनुदानासाठी आवश्यक अटी:
a) महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्था पात्र असतील.
b) संस्थेकडे किमान तीन वर्षांचा गोसंगोपनाचा अनुभव असावा.
c) ५० किंवा त्याहून अधिक गोवंश असणे आवश्यक.
d) गोवंशीय पशुधनाचे ईअर टॅगिंग अनिवार्य.
e) संस्थेचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असणे आवश्यक.
या योजनेमुळे राज्यभरातील शेकडो गोशाळांना दिलासा मिळत असून, आतापर्यंत ५६० गोशाळांना प्रत्यक्ष लाभ मिळाल्याची माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.
Leave a Reply