वाडा, पालघर : प्रदूषणाच्या वाढत्या तक्रारींमुळे चर्चेत असलेल्या वाडा तालुक्यातील टायर प्रोसेसिंग युनिट्सवर कारवाईची मागणी होत असताना, पालकमंत्र्यांच्या कार्यालयातून निघालेले एक पत्र सध्या मोठ्या वादाला तोंड फोडत आहे. संबंधित पत्रामध्ये टायर रिसायकलिंग कंपन्यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने काम केल्याचे नमूद करून, त्यांना “अन्यायकारक कारवाईपासून संरक्षण” देण्याची विनंती करण्यात आली आहे.
या पत्रामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी संतापले आहेत. त्यांनी आरोप केला आहे की, एकीकडे पालकमंत्री सार्वजनिक मंचावर “प्रदूषणकारी कंपन्यांवर कठोर कारवाई करणार” अशी घोषणा करतात, तर दुसरीकडे त्यांच्या कार्यालयातूनच त्या कंपन्यांना अभय देणारे पत्र दिले जाते.
वाड्यातील अनेक गावांमध्ये टायर प्रोसेसिंग युनिट्समुळे होणाऱ्या धूर, दुर्गंधी आणि रासायनिक प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान, पाण्याचे प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्यावर पडणारे परिणाम याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येतात. तरीही संबंधित युनिट्स “ऑरेंज कॅटेगरी”त असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण केल्याचा दाखला देत त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
या पत्रामुळे प्रशासनाची आणि पालकमंत्र्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ग्रामस्थांनी प्रश्न विचारला आहे की, “जनतेसमोर एक भूमिका आणि कंपन्यांसमोर दुसरी, ही दुटप्पी भूमिका कशासाठी?” या घडामोडीनंतर पर्यावरण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाडा परिसरातील नागरिकांनी तातडीने निष्पक्ष चौकशी व प्रदूषणकारी युनिट्सवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे वाडा तालुक्यातील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून आगामी काळात या पत्राचा राजकीय परिणामही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
–


Leave a Reply