पाकिस्तानचा फलंदाज सौद शकील प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान ‘ड्रेसिंग रूम’मध्ये झोपून राहिल्यामुळे वेळेत फलंदाजीसाठी पोहोचू शकला नाही. प्रतिस्पर्धी संघाने अपील केल्यामुळे त्याला नियमानुसार विलंबचीत (टाइम्ड आऊट) घोषित करण्यात आले. क्रिकेट इतिहासात अशा प्रकारे बाद होणारा तो सातवा आणि पाकिस्तानचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
प्रेसिडेंट चषक स्पर्धेतील स्टेट बँक आणि पीटीव्ही यांच्यातील अंतिम सामन्यात हा प्रकार घडला. रमजानच्या पार्श्वभूमीवर हा सामना रात्री ७.३० ते पहाटे २.३० या वेळेत खेळवला जात आहे. पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतक्या रात्री खेळवल्या जाणाऱ्या मोजक्या सामन्यांपैकी हा एक आहे.
स्टेट बँकेच्या संघाकडून खेळणारा सौद शकील पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सज्ज होता. मात्र, वेगवान गोलंदाज मोहम्मद शहझाद याने सलग दोन चेंडूंवर उमर अमीन आणि फवाद आलम यांना बाद केले. त्यानंतर लगेच सौदला मैदानात यायचे होते.
क्रिकेटच्या नियमानुसार, एक फलंदाज बाद झाल्यानंतर पुढील फलंदाजाने तीन मिनिटांच्या आत मैदानात यावे लागते. मात्र, सौद शकील वेळेत पोहोचला नाही. बराच वेळ गेल्यानंतर तो फलंदाजीसाठी आला, पण तेव्हाच पीटीव्ही संघाचा कर्णधार अमाद बट याने पंचांकडे अपील केले. पंचांनी नियमानुसार अपील ग्राह्य धरत सौदला विलंबचीत घोषित केले. त्यानंतर इरफान खान नियाझी फलंदाजीला आला, पण शहझादने त्याचा त्रिफळा उडवत हॅट्ट्रिक पूर्ण केली.
क्रिकेटच्या इतिहासात विलंबचीत होण्याच्या घटना क्वचितच घडतात. याआधी २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज बाद झाला होता. त्यावेळी तो वेळेत मैदानात आला होता, पण हेल्मेटची समस्या निर्माण झाल्यामुळे त्याने चेंडू खेळण्यास उशीर केला. बांगलादेश संघाने अपील केल्यानंतर पंचांनी त्याला बाद घोषित केले होते.
सौद शकीलच्या या विलंबामुळे क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे. झोपेमुळे सामना गमावण्याचा हा दुर्मिळ प्रकार क्रिकेटच्या इतिहासात कायम लक्षात राहील.
Leave a Reply