राज्यातील १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी; ‘विश्व विक्रमात नोंद होणार’ : एस.एम देशमुख

मुंबई : राज्यातील पत्रकारांच्या आरोग्याबाबत ऐतिहासिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. ३ डिसेंबर २०२५ रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त एकाच दिवशी तब्बल १०,००० पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या उपक्रमाची नोंद विश्व विक्रमात होणार असल्याची माहिती परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी दिली.

३ डिसेंबर १९३९ रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली होती. गेल्या दहा वर्षांपासून हा दिवस पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा केला जातो. पहिल्या वर्षी ३,००० पत्रकारांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर हा आकडा सातत्याने वाढत गेल्याने गेल्या वर्षी ८,००० पत्रकारांची तपासणी करण्यात आली. वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी १०,००० पत्रकारांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या उपक्रमासाठी परिषदेशी संलग्न जिल्हा व तालुका पत्रकार संघांना स्थानिक स्वयंसेवी संस्था व वैद्यकीय तज्ज्ञांच्या सहकार्याने तपासणी शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मीडिया अध्यक्ष अनिल वाघमारे व आरोग्य कक्ष प्रमुख दीपक कैतके यांनी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

आरोग्य तपासणीत गंभीर आजार आढळल्यास संबंधित पत्रकारांच्या पुढील उपचाराची जबाबदारी परिषद उचलेल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे पत्रकारांच्या आरोग्य संरक्षणाला मोठा हातभार लागणार आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *