मुंबई : महाराष्ट्रातील तब्बल ३३ लाख बालकं असंसर्गजन्य आजारांच्या विळख्यात अडकली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मधुमेह, अस्थमा, सिकलसेल, जन्मजात हृदयरोग अशा गंभीर आजारांनी राज्यातील लहान वयोगटातील मुलांवर मोठे आरोग्य संकट ओढवले आहे. युनिसेफ आणि राज्य शासनाने संयुक्तरीत्या प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले की, या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग ठोस उपाययोजना आखत आहे. बालकांना योग्य वेळी निदान, उपचार आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. तसेच, या आजारांच्या संदर्भात समाजात जागृती निर्माण करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. विनायक यांनी माध्यमांना उद्देशून सांगितले की, समाजात जागरूकता वाढविण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य माहिती आणि आरोग्यविषयक संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांनी पुढाकार घ्यावा. एस. नागपूर येथील नामवंत बालरोगतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी गिरीश यांनी या संदर्भात सांगितले की, मुलांमध्ये असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि त्यांचे परिणाम कमी करण्यासाठी एक ठोस कार्यदिशा लवकरच तयार केली जाणार आहे.
या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता तळपद, नागपूर एम्सचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, युनिसेफ महाराष्ट्र प्रमुख संजय सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी या संकटावर त्वरित आणि प्रभावी पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. राज्यातील बालकांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी शासन, वैद्यकीय तज्ज्ञ आणि समाज यांच्या समन्वयाने एकत्रित प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, पुढील काळात या आजारांचे प्रमाण वाढल्यास मोठे सामाजिक आणि आरोग्यविषयक आव्हान निर्माण होऊ शकते.
Leave a Reply