अकोल्यात उष्णतेचा कहर; तापमान ४४.१ अंशांवर पोहोचले, उष्णलाटेचा इशारा

राज्यात उष्णतेची लाट दिवसेंदिवस तीव्र होत असून, यंदा अकोल्याने चंद्रपूरलाही मागे टाकत राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद केली आहे. गुरुवारी, १८ एप्रिल रोजी अकोल्याचे कमाल तापमान ४४.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यामुळे अकोल्यात ‘हीट वेव्ह’ (उष्णलाटे) चा इशारा देण्यात आलेला आहे.

 

अकोल्यासह यवतमाळमध्ये ४३.३ अंश आणि चंद्रपूरमध्ये ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. राज्यभर तापमानाचा पारा चढत असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे. अकोल्यामध्ये मागील काही दिवसांपासून तापमान ४२ अंशांवर स्थिर होते, परंतु गेल्या तीन दिवसांपासून या पारा अधिक चढलेला आहे.

 

हवामान विभागाने अकोला आणि आसपासच्या भागांमध्ये उष्णतेच्या स्थितीचा इशारा दिला आहे. विभागाने म्हटले आहे की, पुढील काही दिवसांपर्यंत ही परिस्थिती कायम राहू शकते. नागरिकांना घराबाहेर अनावश्यकपणे जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उष्णतेपासून संरक्षण कसे करावे?

• सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.

• घराबाहेर जाताना डोकं झाकणारा टोपी किंवा पगडी वापरा आणि हलके, सैलसर कपडे घाला.

• पुरेसे पाणी प्या, तसेच लिंबूपाणी, सरबत, ताक यासारख्या द्रव पदार्थांचा सेवन करा.

• सोबत गोड पदार्थ, चॉकलेट किंवा ओ.आर.एस. पावडर ठेवून चक्कर आल्यास तात्काळ आराम मिळवा.

• उष्णतेमुळे उष्माघात, त्वचेचे आजार, थकवा, डोकेदुखी आणि चक्कर येण्याची शक्यता असते. वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी.

 

राज्यातील उष्णतेची स्थिती

• अकोला – ४४.१ अंश

• यवतमाळ – ४३.३ अंश

• चंद्रपूर – ४३ अंश

• अमरावती, वाशीम – ४२ अंशांपेक्षा अधिक

• नागपूर, ब्रम्हपुरी, वर्धा – ४१ अंशांपेक्षा अधिक

• सोलापूर, जेऊर, मालेगाव – ४२ अंशांपेक्षा अधिक

• औरंगाबाद, परभणी – ४२ अंशांपेक्षा अधिक

 

विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा असला तरी, दुपारी उष्णतेची लाट कायम आहे. नागरिक उकाडा आणि उष्णतेच्या झळांमुळे त्रस्त आहेत, त्यामुळे उष्णतेपासून बचाव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *