मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे घरात व शेतात पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक जनावरांचेही जीव गेले आहेत. गोठ्यात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही प्रचंड झाले आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि औसा तालुक्यातील गावांना, तर धाराशिव जिल्ह्यातील परंडा, भूम आणि कळंब तालुक्यातील अनेक गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यातील काही गावांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या गावांना पूराचा मोठा फटका बसला आहे. नदीला पूर आल्यामुळे गावातील नागरिक अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथे सुमारे १५० ते २०० नागरिक अडकले होते. सकाळपासून सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत ९९ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. यामध्ये लाखी, रुई, देवगाव खुर्द नरसाळे चौधरी वस्ती, ढगपिंपरी, करंजा, कपिलापुरी, वाघेगव्हाण आणि नालगाव या गावांतील नागरिकांचा समावेश आहे.
दरम्यान, कळंब तालुक्यातील खोंदला गावात मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे २० कुटुंबांना रात्रीच ग्रामपंचायत कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले. कळंब तालुक्यात अजूनही एक व्यक्ती अडकलेली असून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. भूम तालुक्यात पाणी साचले असले तरी तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
सध्या धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना तात्पुरती सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा जोर कमी-जास्त होत असला तरी प्रशासनाकडून सतत मदत व बचावकार्य सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
–
Leave a Reply