रायगड : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि खालापूरमधील पाताळगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत, तर नागोठणे येथील आंबा नदीने इशारा पातळी गाठली आहे. यामुळे जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून, आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळांना सुट्टी आणि वाहतुकीला फटका
अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पाली पोलीस ठाणे हद्दीतील अंबा नदीवरील पाली-खोपोली रोडवर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उन्हेरे फाट्याजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने सुरक्षिततेसाठी वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच सुधागड तालुक्यातील खुरावले फाटा येथील भेराव गावाकडे जाणारा अंतर्गत रस्ताही पाण्याखाली गेल्याने बंद झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातही पावसाचा जोर वाढल्याने जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. विशेषतः मटण मार्केट परिसरात नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांची धांदल उडाली. खेड नगर परिषदेने तातडीने सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज
हवामान विभागाने १९ जून रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. २० ते २२ जून या कालावधीत या भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यात वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः लातूरमध्ये २० जून रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply