मुंबई : जुलै महिन्यात विधानभवनाच्या आवारात भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादी गटातील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बुधवारी मरीन लाइन्स पोलिसांना पुढील तपास थांबविण्याचे आदेश दिले. १७ जुलै रोजी घडलेल्या या घटनेत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर वाद होऊन मारहाण झाली होती. या घटनेनंतर देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, देशमुख यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
देशमुख आणि पडळकर यांचे समर्थक सर्जेराव टकले यांना दंडाधिकारी न्यायालयाने आधीच जामिनावर सुटका दिली आहे. देशमुख यांचे वकील राहुल अरोटे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, दाखल करण्यात आलेला गुन्हा हा राजकीयदृष्ट्या प्रेरित असून त्यात तथ्य नाही. त्यामुळे तपासाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, देशमुख यांच्यावर पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, भारतीय न्यायसंहितेच्या कलम १९३ अंतर्गत या आरोपांना समर्थन देणारा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
तसेच विधानभवनासारख्या कडक सुरक्षा असलेल्या ठिकाणी प्रवेश करण्यास परवानगी असल्याने बेकायदेशीर प्रवेशाचा आरोप ग्राह्य धरता येत नाही, असा युक्तिवादही करण्यात आला. न्यायालयाने या सर्व बाबींचा विचार करून तपासाला स्थगिती देत दि. १२ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.
Leave a Reply