राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार त्रिभाषिक सूत्राची अंमलबजावणी; २०२५-२६ पासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी; बालभारतीकडून नवीन पाठ्यपुस्तकांची तयारी सुरू. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये नवीन शैक्षणिक बदल राबवले जाणार असून, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. यापूर्वी मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा शिकवल्या जात होत्या, परंतु आता त्रिभाषिक सूत्रानुसार हिंदी तिसऱ्या भाषेच्या रूपात शिकविणे बंधनकारक असणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने बुधवारी अधिकृत घोषणेत सांगितले की, हा निर्णय टप्प्याटप्प्याने लागू केला जाईल. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून या त्रिभाषिक प्रणालीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, या अभ्यासक्रमाची आखणी राष्ट्रीय धोरणाच्या चौकटीत करण्यात आली आहे.
मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सध्या दोनच भाषा शिकवल्या जातात. मात्र उर्वरित शैक्षणिक माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्रजी व मराठी या अनिवार्य भाषांव्यतिरिक्त शिक्षणाचे माध्यम म्हणून तिसरी भाषा शिकवली जाते. त्यामुळे इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदीचा समावेश आता तिसऱ्या भाषेप्रमाणे होणार आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार, नव्या ५+३+३+४ शैक्षणिक संरचनेनुसार प्राथमिक टप्प्यातील (इयत्ता १ ली ते ५ वी) सर्व विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकविल्या जातील — मराठी, इंग्रजी व हिंदी. मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा असेल, तर इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा अनिवार्य असतील.
इयत्ता सहावीनंतर भाषा शिक्षण राज्य शिक्षण मंडळाच्या आराखड्यानुसार राबवले जाईल. या अभ्यासक्रमात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जाईल आणि टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाईल. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ (बालभारती) कडून नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिलीसाठी पाठ्यपुस्तकांची तयारी सुरू झाली आहे. हे पाठ्यपुस्तकांचे स्वरूप राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) अभ्यासक्रमावर आधारित असले तरी, सामाजिक शास्त्र व भाषासंबंधी विषयांमध्ये महाराष्ट्राच्या स्थानिक संदर्भानुसार आवश्यक बदल केले जातील. ही पुस्तके २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.
Leave a Reply