प्रेमविवाहाच्या विरोधातून संतप्त झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील निवृत्त जवानाने थेट आपल्या मुली आणि जावयावर गोळीबार केल्याने चोपडा शहरात शनिवारी रात्री हळहळ व्यक्त केली जात आहे. या थरारक घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी निवृत्त जवानाला चांगलाच चोप दिला, त्यामुळे तोदेखील गंभीर जखमी झाला आहे.सध्या सासरा आणि जावई दोघांवरही जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
दोन वर्षांपूर्वी वडिलांच्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केल्याचा राग अखेर रक्तरंजित थरारात रूपांतरित झाला. तृप्ती वाघ (२४) हिने पुण्यातील अविनाश वाघ (२८, रा. करवंद, ता. शिरपूर) याच्याशी प्रेमविवाह केला होता. याच गोष्टीचा राग मनात बाळगणाऱ्या तृप्तीचे वडील किरण मंगळे (४८, रा. रोहिणी, ता. शिरपूर) यांनी शनिवारी रात्री आपल्या मुलीवर आणि जावयावर थेट गोळीबार केला.ही धक्कादायक घटना चोपडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सायंकाळी घडली. अविनाशच्या बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी तृप्ती आणि अविनाश पुण्याहून आले होते. रात्री सुमारे दहा वाजता किरण मंगळे यांनी तिथेच पोहोचत अगदी जवळून आधी आपल्या मुलीवर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर जावयावरही गोळीबार केला.तृप्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाशच्या पाठीत व हातावर गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे.
अविनाशच्या बहिणीच्या हळदीचा आनंदाचा सोहळा अचानक गोळीबाराच्या आवाजाने हादरून गेला. वऱ्हाडी आणि नातेवाईकांनी ज्या क्षणी तृप्ती आणि अविनाशला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं, त्याच क्षणी संतप्त जमावाने गोळीबार करणाऱ्या किरण मंगळे याला पकडून बेदम मारहाण केली. त्यामुळे तो देखील गंभीर जखमी झाला.ही धक्कादायक घटना समजताच चोपडा शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्वतः तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.तृप्तीचा मृतदेह रात्री उशिरा उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला, तर गंभीर जखमी अवस्थेतील अविनाश व किरण मंगळे यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
आपल्या सूनबाईच्या अमानवी हत्येनंतर तृप्तीची सासू प्रियंका वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून निवृत्त जवान किरण मंगळे याच्याविरोधात चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अवघ्या आठवडाभरात गावठी बंदुकीतून गोळीबाराच्या तीन घटना समोर आल्या असून, त्यातील एक घटनेत धरणगाव तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.या घटनांमुळे पोलिसांचा धाक उरलेला नाही, अशी टीका होऊ लागली आहे. परिणामी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडत चालल्याचा आरोप नागरिकांमधून व्यक्त होतो आहे.
Leave a Reply