मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतून तब्बल २६ लाख ३४ हजार लाभार्थींचे मानधन तात्पुरते रोखण्यात आले आहे. या बहिणींच्या पात्रतेबाबत शंका उपस्थित झाल्याने सध्या छाननी सुरू आहे. मात्र, इतर २.२९ कोटी लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ सुरळीत मिळत आहे, असे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोमवारी सांगितले की, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अहवालानुसार काही लाभार्थी योजनेच्या निकषांशी जुळत नाहीत. या प्राथमिक माहितीनंतरच संबंधित बहिणींचे मानधन थांबविण्यात आले असून, त्याबाlत सखोल चौकशी सुरू आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांचे मानधन पुन्हा सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, २६.३४ लाख बहिणी कायमस्वरूपी अपात्र ठरल्या असल्याच्या बातम्यांना विभागाने फेटाळले आहे. या प्रकरणांवर अजून अंतिम निर्णय झालेला नसून जिल्हा प्रशासनाकडे माहिती संकलनाचे काम सुरू आहे. जिल्हास्तरावर छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र व अपात्र लाभार्थ्यांचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांविरोधात योग्य ती कारवाई केली जाणार आहे. तर पात्र बहिणींना योजनेचा लाभ कोणत्याही अडथळ्याविना मिळत राहील. या योजनेसाठी सरकार दरमहा जवळपास ३ हजार कोटी रुपयांचा खर्च करत असून, लाखो कुटुंबांना आर्थिक मदत मिळत आहे. तत्यामुळे या प्रकरणाची छाननी पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने केली जात असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील लाभार्थींना यात समाविष्ट केले गेले असून, पात्र महिलांना न्याय मिळावा यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
Leave a Reply