मुंबई : ९ ऑक्टोबर जोगेश्वरी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत २२ वर्षीय संस्कृती अनिल अमीन हिचा सिमेंटच्या वीटेमुळे मृत्यू झाला आहे. ही वीट श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या बांधकामाधीन इमारतीवरून खाली पडली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ही घटना बुधवारी सकाळी घडली, जेव्हा संस्कृती कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. काही अंतरावर गेल्यानंतर अचानक वरून एक सिमेंट वीट तिच्या डोक्यावर पडली. ती गंभीर जखमी अवस्थेत खाली कोसळली. तिच्या किंकाळ्या ऐकून तिचे वडील अनिल अमीन बाहेर धावत आले आणि तिला रक्ताने माखलेल्या अवस्थेत पाहिले. तत्काळ तिला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर मेघवाडी पोलिसांनी श्रद्धा लाइफस्टाइल कंपनीशी संबंधित लोकांविरुद्ध बीएनएस कलम १०५ (खुनासमान पण हेतुपुरस्सर नसलेले मनुष्यवध) आणि कलम ३(५) (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, घटनेनंतर ३६ तास उलटूनही अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, अशी माहिती संस्कृतीच्या वडिलांनी दिली. अनिल अमीन यांनी पोलिसांकडे नाराजी व्यक्त करत सांगितले, “घटनेनंतर एवढा वेळ झाला तरी ठेकेदार किंवा साइट सुपरवायझरची चौकशीही झालेली नाही. हे लोकच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहेत.”
या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बांधकामस्थळांवरील सुरक्षा उपायांकडे प्रशासन आणि बांधकाम कंपन्या किती निष्काळजीपणे पाहतात, याचा हा आणखी एक उदाहरण ठरला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, संबंधित बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर हुम्बे यांनी दिली.
Leave a Reply