मुंबई: 2006 च्या मुंबई लोकल ट्रेनमधील साखळी बॉम्बस्फोटानंतर अनेक संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. यापैकी अनेकांनी आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा (RTI) प्रभावी वापर केला. 2015 मध्ये विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या वाहिद शेख यांच्या अनुभवातून हे स्पष्ट झाले आहे की, RTI द्वारे मिळवलेली माहिती न्यायालयात पुरावा म्हणून सादर केल्याने आरोपींना मोठा फायदा झाला. वाहिद शेख यांनी सांगितले, “आम्हाला सत्याची कल्पना होती, त्यामुळे आम्ही RTI अंतर्गत माहिती मागवून ती न्यायालयासमोर ठेवली. याचा परिणाम म्हणून आमची बाजू खरी असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे वर्तन कसे होते, याचीही माहिती आम्ही RTI द्वारे मागवली होती. अनेक अर्जांना उत्तरे मिळाली, तर काहींना मिळाली नाहीत. उत्तरे मिळवण्यासाठी आम्ही अपील दाखल केली.”
कोणत्या माहितीचा झाला उपयोग?
खटल्याशी संबंधित माहिती, तांत्रिक माहिती, पोलीस लॉगबुक, वाहनांची माहिती, साक्षीदारांची साक्ष, रुग्णालयांतील रेकॉर्ड, सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) यासारखी विविध माहिती RTI अंतर्गत मागवण्यात आली. ही माहितीच त्यांच्यासाठी निर्णायक ठरली.
तुरुंगात असताना केला कायद्याचा अभ्यास
शेख यांनी सांगितले की, सुरुवातीला ते दररोज 25 ते 30 RTI अर्ज दाखल करत होते. तुरुंगात असताना त्यांच्यापैकी काहींनी कायद्याची पुस्तके मागवून सखोल अभ्यास केला. त्यांनी सीपीसी (नागरी प्रक्रिया संहिता), सीआरपीसी (फौजदारी प्रक्रिया संहिता), इंडियन एविडन्स ॲक्ट (भारतीय पुरावा कायदा) यांसारख्या पुस्तकांचे वाचन केले.
उच्चशिक्षित आरोपींमुळे RTI चा प्रभावी वापर
बॉम्बस्फोट प्रकरणात अटक केलेल्या अनेकांमध्ये उच्चशिक्षित व्यक्ती होत्या, त्यामुळे त्यांना RTI बद्दल माहिती होती. त्यांनी मिळवलेल्या माहितीमुळे तपास अधिकाऱ्यांच्या माहितीत विसंगती आणि पुराव्यांमधील विरोधाभास उघडकीस आले.
शेख पुढे म्हणाले, “तुरुंगात टाकल्यानंतर आपले निर्दोषत्व कसे सिद्ध करायचे, याचा विचार आम्ही सुरू केला. पोलिसांनी आमच्यावर ठेवलेल्या आरोपांमध्ये अनेक विसंगती होत्या. पोलिसांनी त्यांच्या मर्जीनुसार आरोप ठेवले होते.” विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेला एहतेशाम सिद्दिकी हा देखील RTI कायद्याचा जाणकार होता, असे शेख यांनी नमूद केले. एकंदरीत, या प्रकरणात RTI कायदा केवळ माहिती मिळवण्याचे साधन नाही, तर न्यायासाठी लढण्याचे आणि आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचे एक महत्त्वाचे माध्यम ठरला, हे स्पष्ट होते.
Leave a Reply