कोयंबतूर : भारतात पर्यटन उद्योगामध्ये तीर्थयात्रा पर्यटन हा वेगाने वाढणारा विभाग ठरत असल्याचे मेक माय ट्रिप या प्रवासी संस्थेच्या ‘पिल्ग्रिमेज ट्रॅव्हल ट्रेंड्स 2024-25’ या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
गेल्या आर्थिक वर्षात ५६ प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये झालेल्या नोंदणीवरून १९ टक्क्यांची वाढ नोंदली गेली. यापैकी ३४ स्थळांनी दहापट वाढ दाखवली, तर १५ स्थळांनी तब्बल २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ साधली. ही वाढ केवळ धार्मिक पर्यटनाच्या लोकप्रियतेमुळेच नव्हे, तर उत्तम संपर्क व्यवस्था आणि सर्व वयोगटातील तसेच विविध उत्पन्न गटातील नागरिकांच्या प्रवासातील उत्साहामुळे झाल्याचे संस्थेचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मागो यांनी सांगितले.
अहवालानुसार, बहुतांश तीर्थयात्रा अल्पकालीन आणि उद्देशपूर्ण होत्या. तब्बल ५३ टक्के पर्यटकांनी एकाच दिवस-रात्रीची यात्रा केली, तर दोन रात्रींच्या मुक्कामाचा वाटा ३१ टक्के इतका होता. याशिवाय गटाने केलेल्या प्रवासाचे प्रमाणही लक्षणीय असून ४७ टक्के यात्रेकरू गटाने प्रवास करताना दिसले. पारंपरिक सुट्टीतील प्रवासाप्रमाणेच तीर्थयात्रांचे बुकिंगही बहुधा निघण्याच्या अगदी काही दिवस आधी केले जात असल्याचे दिसते. सुमारे ६३ टक्के आरक्षणे ही प्रवासाच्या तारखेच्या सहा दिवसांच्या आत केली गेली.
दरम्यान, जास्तीत जास्त पर्यटकांनी परवडणाऱ्या श्रेणीतील निवासाची पसंती दर्शवली. तब्बल ७१ टक्के बुकिंग्स हे प्रती रात्र ४,५०० रुपयांखालील खोलींसाठी झाले. तथापि, आलिशान निवासाच्या मागणीतही २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. पारंपरिक हॉटेलांबरोबरच होमस्टे आणि अपार्टमेंट्स यांसारख्या पर्यायी निवासांनाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा अहवाल सूचित करतो की भारतात धार्मिक पर्यटन हा केवळ अध्यात्मिक अनुभव नसून वाढता व्यावसायिक आणि सामाजिक प्रवाह ठरत आहे.
Leave a Reply