मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशात कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणे किंवा न येणे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. पण ते सोबत आले तरी महायुतीला फारसे बळ मिळेल असे वाटत नाही, असे मत राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा ज्येष्ठ भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा अपघाताने विजय झाला होता, असेही ते यावेळी म्हणाले.
राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. शरद पवारांनी यासंबंधी विधान केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी यावर योग्य तो निर्णय घेण्याचे संकेत दिलेत. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपरोक्त मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणे किंवा न येणे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. शरद पवारांना लोकसभेत अपघाताने यश मिळाले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्याचा दारुण पराभव झाला. त्यामुळे ते सोबत आले तरी बळ मिळेल असे वाटत नाही. ज्यांनी पक्ष फोडण्याचे काम केले ते सोबत आल्याने बळकटी मिळेल असे वाटत नाही, असे विखे पाटील गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीवरही भाष्य केले. सध्या राजकारणात पवार, ठाकरे एकत्र येतील, आता राज ठाकरे व एकनाथ शिंदे एकत्र येतील अशी चर्चा आहे. यावरून राज्यात एकीकरणाच्या मोहिमा सुरू असल्याचे वाटते, असे ते म्हणाले.
काय म्हणाले होते शरद पवार?
शरद पवारांनी एका मुलाखतीत भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर नवल वाटू नये असे विधान केले होते. उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटू नये. पण यासंबंधीचा कोणताही निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यायचा आहे. दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी व नेते हे एकाच विचाराचे आहेत. मी आता या प्रक्रियेमध्ये नाही. सुप्रिया सुळे व अजित पवार यांनी बसून चर्चा करावी. नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे, असे ते पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती.
Leave a Reply