आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्यानंतर राज्यात वादाला तोंड

मुंबई : केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे ‘मुंबई की बॉम्बे’ हा जुना वाद पुन्हा एकदा पेटला आहे. “आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई करण्यात आलं नाही, यासाठी देवाचे आभार मानतो,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रीय क्वांटम मोहिमेअंतर्गत फॅब्रिकेशन अँड सेंट्रल फॅसिलिटीचे मुंबई आयआयटीमध्ये उद्घाटन करताना जितेंद्र सिंह बोलत होते. “जसे आयआयटी मद्रास हे नाव कायम राहिले, तसेच आयआयटी बॉम्बेचेही नाव तसेच राहिले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. ‘राज्य सरकारला मुंबई हे नाव खटकत असून पुन्हा बॉम्बे करण्याची तयारी सुरू आहे. तसेच मुंबई आणि एमएमआर गुजरातला जोडण्याचे प्रयत्न होत आहेत. मराठी माणसांनी याचा विचार करायला हवा,’ असे त्यांनी एक्सवर लिहिले.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी रात्रीतून आयआयटी मुंबईच्या प्रवेशद्वारावर “IIT Bombay नाही… IIT Mumbai” असे बॅनर लावून निषेधही नोंदवला.

आयआयटी बॉम्बे हे संसदेच्या कायद्याने स्थापन झालेले असल्याने नावबदलासाठी संसदेत विधेयकाद्वारे दुरुस्ती आवश्यक आहे. तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांसोबतच्या करारांमुळेही नाव बदलणे सहज शक्य नसल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणावर भाजप नेत्यांनीही मनसेवर पलटवार केला असून हा वाद आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *