नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. पहिल्या टप्प्यात २१.८४ लाख लाभार्थी असलेले हे आकडे, १९ व्या हप्त्यापर्यंत ९३.२८ लाखांपर्यंत पोहोचले आहेत, ज्यामुळे लाभाथ्यांमध्ये तब्बल चारपट वाढ दिसून येत आहे. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ३७,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा झाली आहे, ज्यात २० व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, २०१९ मध्ये योजनेच्या पहिल्या हप्त्यात राज्यातील २१.८४ लाख शेतकऱ्यांना सुमारे ४३७ कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) मिळाले होते. २०१९ मधील १९ व्या हप्त्यापर्यंत लाभार्थ्यांची संख्या ९३.२८ लाखांपर्यंत वाढली आणि २,०१३ कोटी रुपये वितरित करण्यात आले. यामुळे केवळ लाभार्थ्यांची संख्याच नव्हे, तर वितरित निधीमध्येही सुमारे पाचपट वाढ झाली आहे.
सर्वाधिक लाभार्थी असलेले जिल्हे
पीएम-किसान योजनेचा सर्वाधिक लाभ मिळालेल्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर (५.०५ लाख), अहिल्यानगर (५.५२ लाख), आणि कोल्हापूर (४.८५ लाख) यांचा समावेश आहे, जिथे प्रत्येकी ५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अनुक्रमे ११०.२ कोटी, ११७.२७ कोटी आणि ९०.८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम १९ व्या हप्त्यात मिळाली आहे.
याउलट, ठाणे (७४,०५१) आणि पालघर (१.१ लाख) यांसारख्या शहरी-केंद्रित आणि आदिवासीबहुल भागांमध्ये लाभार्थ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. सोलापूर जिल्ह्याने ५.०५ लाख लाभार्थ्यांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
वाढीमागील कारणे आणि पुढील उद्दिष्ट:
डिजिटायझेशनमधील वाढ, जमिनीच्या नोंदींची सुधारित पडताळणी, आणि योजनेबद्दलची व्यापक जनजागृती यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत ही वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यातील लाभार्थी क्षेत्रात ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये स्पष्ट तफावत दिसून येते. पीएम-किसान योजना लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार बनली आहे. आता सरकारचे लक्ष आदिवासी आणि दुर्गम भागांतील शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यावर केंद्रित केले जात आहे, जेणेकरून योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.
Leave a Reply