पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांच्या तब्यतीबाबत गंभीर अफवा पाकिस्तानात वेगाने पसरत आहेत. आदियाला तुरुंगात (रावळपिंडी) 2023 पासून शिक्षा भोगत असलेल्या इम्रान खान यांचा तुरुंगातच मृत्यू झाल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार आहे. पाकिस्तानी लष्कराकडून त्यांना विष दिल्याचा दावा अनेक ठिकाणी केला जात असून त्यामुळे देशात गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या महिनाभरापासून इम्रान खान यांना कुणालाही भेटण्याची परवानगी दिली जात नाही, असा पीटीआयचा आरोप आहे. त्यांच्या कुटुंबीयांनादेखील भेट नाकारण्यात येत असल्याने या अफवांना अधिक बळ मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शांततापूर्ण आंदोलनासाठी तुरुंगाबाहेर बसलेल्या इम्रान खान यांच्या बहिणींवर पोलिसांनी अचानक लाठीचार्ज केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. नुरीन नियाझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्ट्रीटलाइट्स बंद करून पोलिसांनी अंधारात महिलांवर हल्ला केला. 71 वर्षीय नुरीन यांना केसांना धरून रस्त्यावर ओढत नेल्याची माहितीही समोर आली आहे.
या प्रकाराविरोधात इम्रान खान यांच्या बहिणींनी पंजाब पोलिस महासंचालक उस्मान अन्वर यांना पत्र पाठवत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. शांततापूर्ण आंदोलनांवर वाढत्या पोलिस अत्याचारांचा त्यांनी तीव्र निषेध केला.
खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहैल आफ्रिदी यांनीदेखील सात वेळा भेटीचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी तुरुंग प्रशासनाने नकार दिला. इम्रान खान यांच्या भेटीवरील सततची बंदी, सोशल मीडियावरील मृत्यूच्या चर्चा आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील पोलिस कारवाईमुळे पाकिस्तानातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे.


Leave a Reply