पुढील २ वर्षांत मध्यप्रदेशचे रस्ते अमेरिकेसारखे दिसतील – नितीन गडकरींचा विश्वास

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा दावा करत सांगितलं की, मध्यप्रदेशातील रस्ते संपर्क पुढील दोन वर्षांत अमेरिकेच्या दर्जाचे होतील. धार जिल्ह्यातील कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलं की, सध्या सुरू असलेली महामार्गांची कामं आणि ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होतील. गडकरींनी कोट्यवधींच्या रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. त्यांनी सांगितलं, “सुमारे ३ लाख कोटींच्या रस्ते प्रकल्पांची कामं मध्यप्रदेशात विविध ठिकाणी सुरू असून ती पुढील एक वर्षात पूर्ण होतील. आम्ही सुमारे ३३,००० कोटींच्या पाच ग्रीनफील्ड इकॉनॉमिक कॉरिडॉर्स उभारतो आहोत,” असंही त्यांनी नमूद केलं.

ओंकारेश्वर मधील नर्मदा किनाऱ्यावर एक ‘आयकॉनिक ब्रिज’ उभारण्याचा निर्णयही रस्ते मंत्रालयाने घेतला आहे. या भव्य प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार झाला असून लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गडकरी म्हणाले, पूर्वी नागपूरहून छिंदवाड्याकडे प्रचारासाठी जाताना गावांमध्ये पोहोचण्यासाठी रस्तेच नव्हते. मात्र गेल्या २० वर्षांत शहरी आणि ग्रामीण भागात रस्ते संपर्कात भरीव वाढ झाली आहे.मध्यप्रदेश हे देशाच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे शेजारच्या राज्यांशी लवकरात लवकर जोडणारे महामार्ग तयार होत आहेत, असंही ते म्हणाले. गडकरींनी ‘स्मार्ट शहरांसोबतच स्मार्ट गावं’ घडवण्याचा संकल्पही मांडला. यामुळे देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागांचा समांतर विकास होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ते पुढे म्हणाले, “भारतीय शेतकरी केवळ अन्नधान्यच नव्हे, तर अनेक प्रकारच्या कच्च्या मालाचं उत्पादनही करत आहेत, ज्याचा पुनर्वापर करून नवा उपयोग केला जात आहे.”

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मोहन यादव, नगरविकास मंत्री कैलाश विजयवर्गीय, सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंग आणि इतर अनेक नेते उपस्थित होते. गडकरींनी मध्यप्रदेशसाठी रस्ते प्रकल्पांची यादी सादर करताना, राज्य सरकारने जमीन संपादन प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असं आवाहन केलं.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *