मुंबईत २०२४ मध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एकूण ५,३०१ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या संख्येत २०२३ च्या तुलनेत २२७ वाढ झाली आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या (MFB) अहवालानुसार, आग प्रतिबंधक उपाययोजनांतील त्रुटी तसेच नागरिकांचा निष्काळजीपणा हे वाढत्या घटनांसाठी जबाबदार असल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार, २०२३ मध्ये ४,९९३ ‘थांबा’ अग्निशमन कॉल (अग्निशमन दलाच्या येण्यापूर्वी विझवलेल्या किंवा किरकोळ समजल्या जाणाऱ्या आगी) नोंदवण्यात आले होते, तर २०२४ मध्ये हे प्रमाण ५,२२८ वर गेले. लेव्हल १ अग्निशमन कॉलची संख्या २०२३ मध्ये ५७ होती, जी २०२४ मध्ये ५५ वर आली. लेव्हल २ च्या घटनांची संख्या १४ वरून १३ वर घसरली, तर लेव्हल ३ मधील आगीच्या घटनांची संख्या ९ वरून ४ वर कमी झाली. दोन्ही वर्षांत प्रत्येकी एक लेव्हल ४ ची घटना नोंदवण्यात आली.
मुंबईतील वाढत्या आगीच्या घटनांमागे अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन न होणे हे महत्त्वाचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मुंबई महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “अग्निसुरक्षा नियमांची तपासणी अधिक कठोर असणे आवश्यक आहे, मात्र मुंबई अग्निशमन दलात मनुष्यबळाची कमतरता आहे. सध्या १६० अधिकाऱ्यांची पदे आहेत, परंतु शहरातील वाढत्या इमारती आणि व्यावसायिक आस्थापनांच्या तुलनेत हे प्रमाण अपुरे आहे.” अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “मुंबईसारख्या मोठ्या शहरातील प्रत्येक इमारतीची अग्निसुरक्षा तपासणी करणे जवळपास अशक्य आहे. अधिकाऱ्यांना अपघातस्थळी तातडीने प्रतिसाद देण्याबरोबरच प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.”
तज्ज्ञांनी सुचवले आहे की, इमारतींच्या अग्निसुरक्षा तपासणीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करावा. महाराष्ट्र गृहनिर्माण सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी सूचित केले की, “मुंबईत सुमारे ५०,००० इमारती आहेत, मात्र अग्निशमन दलाकडे तपासणीसाठी पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे, बीएमसीने सिटीझन पोर्टलवर एक विशेष विभाग सुरू करावा, जिथे सोसायट्या त्यांच्या अग्निसुरक्षा तपासणीचा अहवाल अपलोड करू शकतील आणि उल्लंघन करणाऱ्यांना ऑनलाइन कारणे दाखवा नोटीस जारी करता येईल.”
सोसायट्यांना दर सहा महिन्यांनी अग्निसुरक्षा तपासणी करणे बंधनकारक आहे, मात्र बहुतांश सोसायट्या हे गांभीर्याने घेत नाहीत. अनेक इमारतींमध्ये अंतर्गत अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसते, सुरक्षा कर्मचारी प्रशिक्षित नसतात, तसेच देखभाल-दुरुस्ती कडे दुर्लक्ष केले जाते. “नागरिकांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे,” असे प्रभू यांनी स्पष्ट केले.
वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटा यांनीदेखील या मुद्द्यावर भर दिला. “फक्त अधिकाऱ्यांच्या तपासणीवर अवलंबून न राहता, गृहनिर्माण सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापने स्वतः अग्निशमन कवायती आयोजित कराव्यात. अनेक रहिवाशांना आग लागल्यास सुरक्षित बाहेर पडण्याची प्रक्रिया माहिती नसते किंवा अग्निशामक उपकरणे कशी वापरायची हे माहीत नसते. त्यामुळे मोठ्या दुर्घटना घडतात. अशा गंभीर घटनांना टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियमित कवायती घ्याव्यात आणि सुरक्षा रक्षकांना योग्य प्रशिक्षण द्यावे,” अशी त्यांनी सूचना केली.
अग्निसुरक्षेसाठी प्रशासन आणि नागरिक दोघांनीही जबाबदारी घ्यावी. अधिकाऱ्यांनी काटेकोर तपासणीसह तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, तर नागरिकांनी स्वतःहून सुरक्षेचे नियम पाळण्याची सवय लावून घ्यावी. अन्यथा, भविष्यात आगीच्या घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Leave a Reply