”जग संकटात असताना भारत स्थैर्याचे प्रतीक” : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा देताना भारताच्या जागतिक भूमिकेवर प्रकाश टाकला आहे. “जग विविध संकटांनी ग्रस्त असताना भारत स्थैर्याचे प्रतीक म्हणून उदयास आला आहे,” असे सांगत त्यांनी देशातील नागरिकांना स्वदेशीचा स्वीकार आणि आत्मनिर्भरतेचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

दिवाळीच्या शुभसंदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ऊर्जा आणि उत्साहाने भरलेल्या या दिवाळीत सर्वांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचा अंगीकार करावा. स्वदेशी वस्तूंचा वापर करून देशाच्या प्रगतीत हातभार लावा.” त्यांनी पुढे सांगितले की, भारताने गेल्या काही वर्षांत विकासाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. वस्तू आणि सेवा करातील सुधारणा, उद्योगवृद्धी आणि मध्यमवर्गीयांसाठी घेतलेले निर्णय यामुळे देशाची आर्थिक पायाभरणी अधिक मजबूत झाली आहे. मोदींनी राममंदिराच्या उद्घाटनाचा उल्लेख करताना “हे देखील आपल्या संस्कृतीतील नव्या दिवाळीचे प्रतीक आहे,” असे म्हटले. नागरिकांनी सदाचार आणि सेवाभावाचा मार्ग स्वीकारावा, हा प्रभू श्रीरामांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी जागतिक पातळीवरील संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळात भारताने दाखवलेल्या स्थैर्याचे कौतुक केले. “भारत आज जगात संवेदनशीलतेचे आणि स्थैर्याचे केंद्र म्हणून ओळखला जातो. हा आत्मविश्वासच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल,” असे ते म्हणाले. दिवाळीच्या निमित्ताने दिलेल्या या संदेशातून पंतप्रधान मोदींनी नागरिकांना देशभक्ती, स्वावलंबन आणि सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *