फाळणी… १४ ऑगस्ट १९४७ रोजी महान वैचारिक परंपरा जपणाऱ्या भारताच्या ह्रदयात झालेली खोल जखम. खरं तर ती होती घाई घाईत घडलेली एक राजकीय घटना, नव्हे दुर्घटना होती. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गांधी-नेहरू-पटेल आदी नेत्यांना दूरदृष्टी नव्हती असे कोणीच म्हणू शकत नाही. पण एकदाचे स्वातंत्र्य मिळणार, या एकाच बातमीने हे सारे विचारी नेतृत्व बेधुंद झाले. आणि फाळणीचे, दोन देशांच्या राजकीय बेचक्यात सापडलेल्या, हिंदू – मुस्लिम समाजाचे रक्षण केले पाहिजे, याचे स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना भानच उरले नव्हते.
दोन महायुद्धे आणि आर्थिक अस्थैर्याने विकल झालेल्या इंग्लंडला भारतासारखी सोन्याची कोंबडी हाताबाहेर चालली याची जाणीव झाली होती. त्यामुळे ‘फोडा आणि झोडा’ या पाताळयंत्री ब्रिटिश नीतीचा विखारी फुत्कार करत त्यांनी धार्मिक आधारावर भारताची फाळणी करण्याचा निर्णय केला. आणि गंगाजमुनी भारतीय संस्कृती अलग करण्यात इंग्रजी सत्तेला यश आले. कागदावर घेतलेल्या त्या एका निर्णयाने जवळपास वीस-पंचवीस लाख निरपराध लोकांचा जीव घेतला. पन्नासेक लाख निष्पाप लोकांना हक्काची घरंदारं सोडून परागंदा होण्याची दुर्दैवी वेळ आली… हजारो महिलांना आपले सर्वस्व गमवावे लागले. असंख्य मुलामुलींचे बाल्य निर्माल्य झाले. दोन नव्याने निर्माण झालेल्या देशांच्या तावडीत सापडलेल्या काश्मिरी जनतेचे तर अक्षरशः हाल झाले… अजूनही सुरूच आहेत… १९७२ मध्ये भाषेच्या आधारे निर्माण झालेल्या बांगलादेशाने घाईने फाळणी करण्याची ब्रिटिश नीती कशी चुक होती हे दाखवुन दिले, पण तोवर जागतिक राजकारणात भारत-पाक तणाव एक संघर्ष बिंदू बनला होता … एकूण काय तर फाळणीच्या एका फटक्याने भारतीय उपखंडातील जसे राजकारण बदलले तसेच, फाळणी हा शब्द कोट्यावधी घरातील, मनातील भळभळती जखम बनला. नुकतेच बांगलादेशात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे अगदी १९४७ च्या वेळेची स्थिती निर्माण झाली आहे. तेथील हिंदू समाजावर पन्नास वर्षात दुसऱ्यांदा फाळणीचा भीषण अनुभव घेण्याची वेळ येणे यासारखे दुसरे दुर्दैव नाही.
आपण साधारणत: दुःखद आठवणींचा उघड उच्चार करणं टाळतो. कदाचित त्याच न्यायाने ही फाळणीची दुःखदायी घटना आम्ही ह्रदयात बंदिस्त केली होती. पण गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या धैर्याने फाळणीच्या आठवणीची उजळणी केली. पंतप्रधानांनी १४ ऑगस्ट हा
फाळणीच्या_भीषण_स्मृतींचा_स्मरण_दिन”
विभाजन विभिशिका दिवस
म्हणून घोषित करून फार मोठे पाऊल उचललं आहे. मी इस्त्रायल आणि जर्मनी मधील शहरात नाझी हिटलरच्या हिंस्र अत्याचारात, हाॅलोकास्टमध्ये बळी पडलेल्या लोकांना श्रध्दांजली वाहण्यासाठी निर्माण केलेली संग्रहालये पाहिली आहेत. त्या म्युझियमना भेट दिल्यावर धर्म, वंश किंवा भाषेच्या अभिमानाने प्रेरित झालेले देश वा समाजाचे नेतृत्व किती अमानुष वागू शकते याचा प्रत्यय येतो आणि मन विषण्ण होते. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होते. आम्ही भारतीय लोकांनी सुद्धा फाळणीच्या भीषण स्मृतींचा आठव करताना असे म्युझियम निर्माण केले पाहिजेत. सरकार जर पुढाकार घेत नसेल तर, गेल्या सत्तर – पंच्याहत्तर वर्षात निर्वासित म्हणून महाराष्ट्रात आलेल्या, मुंबई , पुणे, ठाणे आदी परिसरातील “कॅम्प” मध्ये राहिलेल्या, शेकडो सिंधी – पंजाबी करोडपती लोकांनी पुढे येऊन हा सामाजिक दस्तऐवज निर्माण केला पाहिजे, जपला पाहिजे. जिथं या फाळणीत मृत्युमुखी पडलेल्या, हरवलेल्या दुर्दैवी बंधूं-भगिनींच्या किमान नावांचा उल्लेख असावा. त्यांना पुष्पांजली वाहण्यासाठी स्मृती स्तंभ उभारावा. फाळणीची छायाचित्रे, ध्वनी चित्रफिती नवीन पिढीतील लोकांना पहायला मिळाली पाहिजेत. जेणेकरून कोणत्याही कट्टरतेचा आग्रह किती संहारक असतो तद्वत संकटाकडे सहानुभूतीपूर्वक नजरेने पाहणे किती घातक असते, याची संग्रहालय पहाताना जाणीव होईल. आणि त्याच बरोबर देशातील सर्वच राजकीय पक्षांना, सर्व धार्मिक संघटनांना स्वातंत्र्य दिन साजरा करताना, फाळणीमुळे मरण पावलेल्यांना श्रध्दांजली वाहताना भविष्यातील राजकारणात कोणत्या चुका टाळणे आवश्यक आहे, याचेही पुरेसं भान येईल, मला वाटतं, तिच फाळणीच्या भीषण काळात घरदार, प्राण, प्रतिष्ठा गमावून बसलेल्या निरपराध बंधू भगिनींना वाहिलेली खरी श्रध्दांजली असेल. आणि मुख्य म्हणजे, आज बांग्ला देशातील हिंदू,बौद्ध, ख्रिश्चन आदी अल्पसंख्यांक समाजातील लोक, जे बांगलादेशातील वाढत्या कट्टर इस्लामिक कारवायांमुळे आज दुसऱ्या फाळणीच्या सावटाखाली उभे आहेत. त्यांना या निमित्ताने आधाराचा हात आपणच दिला पाहिजे. कारण फाळणी, मग ती हृदयाची असो, समाजाची असो किंवा देशाची, ती वाईटच !
Leave a Reply