भारतीय कसोटी व एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाने वानखेडे स्टेडियममधील एका प्रेक्षक स्टँडला नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत १५ एप्रिल रोजी घेतला. या गौरवाबद्दल रोहितने शुक्रवारी आपली प्रतिक्रिया देताना मनापासून कृतज्ञता व्यक्त केली असून, “आता माझी भावना मला शब्दात सांगता येत नाही. मी संपूर्ण आयुष्यभर या सन्मानासाठी ऋणी राहीन,” असे भावनिक उद्गार रोहितने काढले.
रोहित मुंबई टी२० लीगच्या तिसऱ्या सत्राच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होता. ही स्पर्धा येत्या २६ मेपासून सुरू होणार आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यामुळे रोहित यावेळी मैदानात खेळताना दिसणार नसला, तरी या लीगचा प्रमुख चेहरा म्हणून तो सहभागी असणार आहे.
“माझ्या नावाने स्टँड असावा, अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. क्रिकेट किती काळ खेळता येईल हे सांगता येत नाही, पण अशा प्रकारचा सन्मान मिळणे खरोखरच अनपेक्षित आणि हृदयस्पर्शी आहे,” असे रोहितने नमूद केले.
आपल्या सुरुवातीच्या क्रिकेट प्रवासाच्या आठवणी शेअर करताना रोहित म्हणाला, “२००३-०४ मध्ये जेव्हा मी १६ वर्षांखालील मुंबई संघात होतो, तेव्हा आम्ही रणजी सामन्यांना पाहण्यासाठी आझाद मैदानातून चालत वानखेडे स्टेडियमपर्यंत यायचो. त्या काळात स्टँडमध्ये बसायलाही तिकिटं मिळवणं कठीण होतं, आणि आज त्याच स्टँडला माझं नाव दिलं जातंय – ही भावना शब्दांत मांडणं कठीण आहे.”
“माझ्या यशाचं सूत्र फार साधं आहे – ‘गेलं ते विसरून जा, आणि पुढच्या क्षणाकडे लक्ष केंद्रित करा.’ आपल्या हातात नसलेल्या गोष्टींसाठी चिंता करण्याऐवजी पुढच्या संधीसाठी स्वतःला सज्ज ठेवणं महत्त्वाचं आहे. आत्मविश्वास कधीही हरवू नका – तोच आपल्या परिस्थितीला कलाटणी देऊ शकतो,” असं स्पष्ट मत रोहितने व्यक्त केलं.
एमसीएने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत दिलेल्या योगदानाबाबत रोहित म्हणाला, “मुंबई क्रिकेट संघटनेशिवाय मी आज जिथे आहे, तिथे पोहोचू शकलो नसतो. त्यांनी वेळोवेळी मला संधी दिल्या. सरावासाठी लागणाऱ्या सुविधा, दर्जेदार खेळपट्ट्या यांची सातत्याने उपलब्धता मला मिळाली. हीच एखाद्या खेळाडूसाठी खरी साथ असते.”
दरम्यान, आगामी मुंबई टी२० लीगसाठी दोन नव्या संघमालकांची निवड करण्यात आली आहे. रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लिमिटेड आणि रॉयल एज स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट हे नवे संघ चालक असतील. याशिवाय इतर सहा संघ मालकांची निवडही पूर्ण करण्यात आली आहे.
Leave a Reply