धावत्या रेल्वेत रोख रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मध्य रेल्वेचा उपक्रम यशस्वी ठरला आहे. मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम सेवा सुरू करण्यात आली असून, ही सुविधा मिळवणारी देशातील पहिलीच एक्सप्रेस ट्रेन आहे. त्यामुळे आता प्रवाशांना प्रवासादरम्यानही सोयीस्करपणे पैसे काढता येणार असून, याचा थेट फायदा प्रवाशांसह रेल्वेच्या महसुलालाही होणार आहे.या उपक्रमाची कल्पना प्रथम भुसावळ रेल्वे विभागात झालेल्या नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल संकल्पनांच्या बैठकीत मांडण्यात आली होती. बँक ऑफ महाराष्ट्रने “नवीन, नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल कल्पना योजना” (NINFRIS) अंतर्गत यावर औपचारिक प्रस्ताव सादर केला. याअंतर्गत सध्या गाडी क्रमांक 12110 मनमाड-मुंबई सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेसमध्ये या एटीएम सुविधेची चाचणी सुरू आहे.ही गाडी दररोज मनमाड ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावत असून, २२०० हून अधिक प्रवासी रोज या गाडीतून प्रवास करतात.
मध्य रेल्वेच्या मनमाड वर्कशॉपमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा करून खास कोच तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये एटीएम बसवले गेले आहे. मंगळवारी सकाळी ही एटीएम सेवा असलेली पंचवटी एक्सप्रेस मुंबईत दाखल झाली. हे एटीएम एसी चेअर कार कोचमध्ये बसवण्यात आले असून लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी अधिकृतपणे सुरू होणार आहे. चालत्या गाडीत एटीएम सुरळीत चालण्यासाठी योग्य विद्युत प्रणाली व संरचनात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या विद्युत आणि यांत्रिक विभागांच्या समन्वयातून राबवण्यात आला आहे. प्रवासादरम्यान आर्थिक व्यवहार करणे सोयीचे व्हावे, यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व आकस्मिक गरज असलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे.ही एटीएम सेवा मोबाईल नेटवर्कद्वारे सतत जोडलेली राहणार असून, गाडी सुरू असतानाही खऱ्या वेळेत व्यवहार शक्य होणार आहे. एटीएमची सुविधा देणारी ही पहिलीच एक्स्प्रेस ठरली आहे.

देशातील पहिली एटीएम सेवा आता धावत्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये; प्रवाशांना मिळणार प्रवासादरम्यान रोख रकमेची सोय
•
Please follow and like us:
Leave a Reply