बीडमध्ये युवकांसाठी औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय; ‘सीआयआयआयटी’ प्रकल्पासाठी १९१ कोटींची गुंतवणूक

बीड जिल्ह्यातील युवकांना उद्योगसक्षम बनवून त्यांच्यासमोर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अ‍ॅण्ड ट्रेनिंग’ (CI3T) म्हणजेच ‘सीआयआयआयटी’ हे केंद्र बीडमध्ये स्थापन होणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अवघ्या दोन आठवड्यांतच ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत, १९१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून बीडमध्ये तांत्रिक व औद्योगिक प्रशिक्षण देणारे अत्याधुनिक केंद्र उभे राहणार आहे.

या केंद्रात दरवर्षी सुमारे ७ हजार युवकांना तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून, नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळेल, असे प्रशासनाने सांगितले. यामुळे बीड जिल्ह्यातील तरुणाईसाठी उद्योगाभिमुख वातावरण तयार होऊन स्थानिक स्तरावरच रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

२ एप्रिल २०२५ रोजी बीड दौऱ्यावेळी अजित पवार यांनी युवकांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ला सहकार्य करण्याचे आवाहन करणारे पत्र पाठवले. या आवाहनाला प्रतिसाद देत कंपनीने अधिकृत पत्राद्वारे १९१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह बीडमध्ये प्रकल्प राबविण्याची तयारी दर्शवली.

हे केंद्र केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता, नवकल्पना विकसित करणे, नवउद्योजक घडवणे, उत्पादन प्रक्रियेतील नवनवीन प्रयोग घडविणे अशा विविध उपक्रमांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. ग्रामीण भागातील युवकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळाल्याने स्थानिक पातळीवरच उद्योग सुरू करण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल.

‘सीआयआयआयटी’ हा प्रकल्प फक्त बीडसाठीच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. औद्योगिक आणि तांत्रिक क्षेत्रातील युवकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, याबाबत विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *