राज्यातील औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना देणाऱ्या १९ नव्या प्रकल्पांना राज्य सरकारने मंजुरी दिली असून, विदर्भ आणि मराठवाड्याला यामध्ये विशेष स्थान मिळाले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ‘ऑरिक सिटी’ परिसरात हे उद्योग प्रकल्प उभारले जाणार असून, यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, अन्वी पॉवर इंडस्ट्रीज प्रा. लि., आणि जेनसोल इंजिनीअरिंग लि. या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रात एकूण १,११,७२५ नव्या रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
राज्यातील उद्योग आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना हिरवा कंदील देण्यात आला आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटी परिसरात ५०० एकर जमिनीत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा ऊर्जा-आधारित वाहन निर्मिती प्रकल्प साकारला जाणार आहे. तसेच, जेनसोल इंजिनीअरिंग कंपनी येथे चारचाकी इलेक्ट्रिक वाहने तयार करेल, तर अन्वी पॉवर इंडस्ट्रीज प्रा. लि. बॅटरी उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे.
या प्रकल्पांना राज्य सरकारच्या उद्योग विभागाने मंजुरी दिल्यानंतर दावोस येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेत यासंदर्भात करार करण्यात आला. त्यामुळे आगामी काळात विदर्भ आणि मराठवाड्याच्या औद्योगिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होणार आहे.
गुंतवणूक आणि रोजगार संधी
• अन्वी पॉवर इंडस्ट्रीज प्रा. लि. – छत्रपती संभाजीनगरमध्ये १०,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक, ५,००० रोजगार संधी.
• रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. – छत्रपती संभाजीनगरमध्ये १४,३७७ कोटी रुपयांची गुंतवणूक, ४,००० रोजगार संधी.
• रिलायन्स लाइफ सायन्स – नाशिक आणि मुंबई येथे ८,२०६ कोटी रुपयांची गुंतवणूक, ४,७९० रोजगार संधी.
• जेनसोल इंजिनीअरिंग लि. – ४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक, ३,००० रोजगार संधी.
• सिलोन बेव्हरेजेस कॅन प्रा. लि. – अहिल्यानगर येथे १,०३९ कोटी रुपयांची गुंतवणूक, ४५० रोजगार संधी.
या गुंतवणुकींमुळे छत्रपती संभाजीनगर परिसरात १२,००० थेट रोजगार संधी उपलब्ध होतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल.
ऑरिक सिटीमधील शेंद्रा आणि बिडकीन हे औद्योगिक नोड्स देशातील प्रमुख ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मिती हब म्हणून विकसित होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील वाहन उद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळण्याची शक्यता आहे.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या ईव्ही प्रकल्पामुळे दरवर्षी २.५ लाख इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांचे उत्पादन येथे होणार आहे. एथर एनर्जी, टोयोटा, जेएसडब्ल्यू यांसारख्या मोठ्या कंपन्यांबरोबर आता रिलायन्स ईव्ही, अन्वी पॉवर इंडस्ट्रीज, जेनसोल इंजिनीअरिंग यांनी केलेल्या गुंतवणुकीमुळे ऑरिक सिटी भारतातील महत्त्वाचे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन केंद्र म्हणून नावारूपाला येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आणण्याचा संकल्प राबवत आहे. बिडकीन येथे आतापर्यंत २ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक मंजूर झाली असून, या नव्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्र अधिक बळकट होईल.
या प्रकल्पांमुळे औद्योगिक पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतील, नवीन रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा हे औद्योगिकदृष्ट्या समृद्ध होण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकतील.


Leave a Reply