महाराष्ट्रातील बँकांनी मराठीत सेवा द्याव्यात, अन्यथा मनसेचे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. बँकांना आरबीआयने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी होत नसेल, तर कायदा-सुव्यवस्थेचा भंग झाला, तर त्याला संबंधित बँका जबाबदार ठरतील, असा इशाराही त्यांनी आपल्या पत्रातून दिला आहे. राज ठाकरे यांनी बुधवारी भारतीय बँक संघटना (IBA) ला पाठवलेल्या एका ठणकावणाऱ्या पत्रात ही मागणी केली. या पत्राद्वारे, त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पूर्वीच्या परिपत्रकाचा संदर्भ देत सांगितले की, सर्व बँकांनी इंग्रजी आणि हिंदीसह स्थानिक भाषेत म्हणजेच महाराष्ट्रात मराठीत सेवा पुरवाव्यात, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पत्रात असेही नमूद आहे की, फक्त सेवा पुरवणं पुरेसं नाही, तर बँकांच्या फलकांवर, सूचना बोर्डांवर देखील मराठीचा वापर अनिवार्य असावा. इंग्रजी-हिंदीसोबत मराठी भाषेचा सन्मान केला गेला पाहिजे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
आदेश द्या, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढेल!
बँकांना मराठीत सेवा देण्यासाठी आवश्यक ती सूचना द्या, अन्यथा मनसेचं आंदोलन अधिक तीव्र होईल आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला बँक प्रशासनच जबाबदार असेल,” असा इशारा राज ठाकरे यांनी पत्राद्वारे दिला.गुढीपाडव्याच्या दिवशी ३० मार्च रोजी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातही मराठीचा मुद्दा उचलला होता. मराठीचा अपमान करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी तिथेच दिला होता. अलीकडेच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना थेट कृती थांबवण्यास सांगितले होते. “प्रचार पुरेसा झाला आहे, आता थांबा,” असं ते म्हणाले होते. मात्र या आंदोलनात तूर्तास ब्रेक घेतला असला, तरी मराठीच्या मुद्द्यावरचा मनसेचा रोष अद्याप शमलेला नाही.
दरम्यान, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून,मनसे कार्यकर्ते बँकांमध्ये घुसून कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
Leave a Reply