आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२५ धाडसी मयुरी साळवी;अग्निशमन सेवेत जिद्द आणि मातृत्वाचं सुंदर समतोल

अग्निशमन सेवेसारख्या जबाबदारीच्या क्षेत्रात काम करताना कुटुंब आणि कर्तव्य यांचा समतोल साधणे हे आव्हानात्मक ठरते. मुंबई अग्निशमन दलातील (एमएफबी) मयुरी साळवी यांच्यासाठी हे अधिकच भावनिक असते, कारण १८ महिन्यांच्या चिमुकल्याला रडत सोडून आपत्तीग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी झोकून देणे हा त्यांचा दिनक्रम आहे. तरीही, समाजसेवेची त्यांची निष्ठा त्यांना दररोज नव्या जोमाने या जबाबदाऱ्या पार पाडण्याची प्रेरणा देते.

मयुरी साळवी यांना गणवेशधारी सेवेसाठी प्रेरणा त्यांच्या मावशींकडून मिळाली, ज्या ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या समर्पणाने आणि जबाबदारीने साळवी यांच्या मनावर गडद ठसा उमटला. “तेव्हाच ठरवलं की देशसेवेसाठी मला गणवेश परिधान करायचा,” त्या सांगतात. सुरुवातीला त्यांनी मुंबई पोलिस दलात भरती होण्याचा विचार केला, मात्र अग्निशमन दलात भरतीची संधी समजताच त्यांनी ती स्वीकारली. भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण करून त्यांनी एमएफबीमध्ये स्थान मिळवले. आज त्या ३३१ महिला अग्निशमन कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत.

वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू शकणाऱ्या साळवी यांनी समाजसेवेच्या जाणीवेने एमएफबीमध्ये रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्या दक्षिण मुंबईतील फोर्ट अग्निशमन केंद्रात कार्यरत आहेत, जिथे गेल्या पाच वर्षांत त्यांनी अनेक धोकादायक प्रसंगांचा सामना केला आहे.
मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या या केंद्रातून शहरातील अनेक आपत्कालीन परिस्थितींना प्रतिसाद दिला जातो.

त्यांच्या कारकिर्दीत, त्यांना अग्निशमन क्षेत्रातील असंख्य आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. साळवी यांना आठवतं की, मेमनवाडा येथे लागलेली आग ही त्यांच्या कार्यकाळातील सर्वांत आव्हानात्मक घटना होती. या आगीत सिलिंडर स्फोटांचे सातत्य आणि इमारतीत अडकलेल्या रहिवाशांमुळे बचाव कार्य अधिक कठीण झाले होते. गर्द धुराच्या ढगांमध्ये मला मदतीसाठी हाका मारणारे आवाज ऐकू येत होते,” त्या सांगतात. “माझ्या आठवणीत एक ज्येष्ठ नागरिक ठळक आहे, जो चालू शकत नव्हता आणि १४ व्या मजल्यावर अडकला होता.

आम्ही त्यांना सुरक्षीत खाली आणले.” सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, आणि काही तासांत आग विझवण्यात आली.
कर्तव्य आणि मातृत्व यांचा समतोल आपत्कालीन परिस्थितींमध्ये कर्तव्य बजावताना लहान बाळाला घरी सोडणे हे मयुरी साळवी यांच्यासाठी मोठे भावनिक आव्हान ठरते. “मी ड्युटीवर जाताना तो रडतो, ते पाहून मन हेलावते,” त्या सांगतात. तथापि, त्यांच्या यशामध्ये कुटुंबाची विशेषतः सासूची महत्त्वाची भूमिका आहे. “माझ्या सासू आणि कुटुंबीयांनी मला खूप साथ दिली. ते माझ्या मुलाची काळजी घेतात आणि घरातील समस्यांची चिंता करू देत नाहीत,” त्या नम्रपणे सांगतात.
“माझ्या कुटुंबाला माझ्या कामाच्या स्वरूपाची जाणीव आहे, त्यामुळे ते त्यानुसार जुळवून घेतात.”

महिला दिनाच्या निमित्ताने मयुरी साळवी यांचा संघर्ष आणि समर्पण महिला सशक्तीकरणाचे प्रतीक आहे. कुटुंब आणि कर्तव्य यांचा उत्तम समतोल साधत, त्या इतर महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *