जिओच्या ग्राहकांचे इंटरनेट स्पीड वाढणार, मुकेश अंबानींनी एलोन मस्कसोबत केला मोठा करार

मुंबई : देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या 45 कोटींपेक्षा अधिक ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. जिओने एलोन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीसोबत महत्त्वाचा करार केला आहे. यानंतर भारतात स्टारलिंकची ब्रॉडबँड सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे देशातील कोट्यवधी ग्राहकांना जलद आणि सक्षम इंटरनेट सेवा मिळण्याचा फायदा होणार आहे.

रिलायन्स जिओच्या या निर्णयाच्या अवघ्या एका दिवस आधी एअरटेलनेही स्टारलिंकसोबत करार करण्याची घोषणा केली होती. दोन्ही कंपन्यांनी स्पेसएक्ससोबत भागीदारी जरी केली असली, तरी भारत सरकारकडून स्टारलिंक सेवेच्या विक्रीसाठी अंतिम मान्यता मिळणे बाकी आहे. मान्यता मिळाल्यानंतर रिलायन्स जिओ आपल्या रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर स्टारलिंकची उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. यासोबतच, उपकरणे कशी वापरायची याबाबतही ग्राहकांना सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.स्पेसएक्ससोबतच्या या करारामुळे भारतातील दुर्गम, ग्रामीण आणि इंटरनेटपासून वंचित असलेल्या भागांमध्ये हाय-स्पीड इंटरनेट सेवा पोहोचणार आहे. यामुळे देशाच्या डिजिटल प्रगतीला गती मिळणार आहे. सध्या जिओ ही जगातील सर्वाधिक डेटा ट्रॅफिक असलेली मोबाइल ऑपरेटर कंपनी आहे, तर स्पेसएक्स ही लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट सेवेतील आघाडीची कंपनी आहे. दोन्ही दिग्गज कंपन्यांमधील हा करार डिजिटल क्षेत्रात नवी क्रांती घडवू शकतो.

सॅटेलाइट इंटरनेटचे महत्त्वाचे फायदे
a) दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा: जिथे फायबर ऑप्टिक किंवा केबल इंटरनेट पोहोचू शकत नाही, अशा दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये सॅटेलाइट इंटरनेट सहज उपलब्ध होईल.
b) हाय-स्पीड इंटरनेट सेवा: स्टारलिंकच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना पारंपरिक ब्रॉडबँडपेक्षा वेगवान इंटरनेट सेवा मिळू शकते.
c) जलद सेटअप: सॅटेलाइट इंटरनेटचे सेटअप इतर कनेक्टिव्हिटी पर्यायांपेक्षा सोपे असते. मोठ्या टॉवर किंवा विशेष संरचनेची गरज नसते.
d) आपत्कालीन परिस्थितीत मदत: नैसर्गिक आपत्तींच्या वेळी पारंपरिक नेटवर्क बंद पडल्यास सॅटेलाइट इंटरनेट महत्त्वाचे ठरणार आहे.
e) कमी मेंटेनन्स: सॅटेलाइट नेटवर्कची देखभाल कमी असते, त्यामुळे ही सेवा दीर्घकाळ टिकते.
भारत सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या सेवेची अंमलबजावणी होईल. यामुळे देशाच्या डिजिटल प्रवासाला वेग मिळणार आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *