नवी दिल्ली: केंद्रीय गृह मंत्रालय आणि विविध राज्य सरकारांनी इंटरनेटवरील बेकायदेशीर सामग्री ओळखण्यासाठी व ती नजरेस आणून देण्यासाठी ५४,८३३ सायबर स्वयंसेवकांची नियुक्ती केल्याचे २०२३-२४ च्या मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे.
भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (१४सी) ने २०२० मध्ये हा कार्यक्रम सुरू केला होता. यामध्ये नागरिकांना सायबर गुन्ह्यांविरोधात योगदान देण्यासाठी एकाच व्यासपीठावर आणले जाते. या कार्यक्रमाद्वारे नागरिक सायबर तज्ञ, वादग्रस्त मजकुरविषयी तक्रार करणारे आणि सायबर स्वच्छतेचे प्रसारक म्हणून नोंदणी करू शकतात. अहवालानुसार, आतापर्यंत २२,९४२ जण आक्षेपार्ह मजकूर तक्रारदार, २२,०१७ जण सायबर जागरूकता प्रसारक आणि ९,८१९ सायबर तज्ञ म्हणून नोंदणीकृत झाले आहेत.
सायबर स्वयंसेवकांचे नेमके काम आणि त्यांच्यासमोरील आव्हाने याविषयी गुजरातमधील एका केंद्रीय विद्यापीठातील सायबर स्वयंसेवकाने सांगितले की, २०२३ च्या G-२० परिषदेदरम्यान सरकारी वेबसाइट्सवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले झाले होते. “हॅकर्सनी भारताचा ध्वज वेबसाइट्सवरून काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही १४C च्या मदतीने या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवले होते.”
सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी आमची सुरक्षा यंत्रणा रोज सरासरी १,५००-२,००० फसवणूक करणारी खाती शोधून काढत असून, त्या संदर्भात “सायबर क्राईम पोर्टल”ला दररोज ६७,००० कॉल्स येतात. स्वयंसेवकांना www.cybercrime.gov.in या पोर्टलद्वारे नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. भारताच्या सार्वभौमत्व व सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी, जातीय सलोखा बिघडवणारी किंवा बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री आमच्या नजरेस आणून देऊ शकतात.
१४C ने Google आणि Facebook यांसारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांसोबत भागीदारी करून सायबर गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. गुगल जाहिरात प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखण्यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत आमच्याकडे व्हॉट्सॲप संदर्भात ४३,७९७ तक्रारी आल्या होत्या, तसेच टेलिग्राम (२२,६८०), इंस्टाग्राम (१९,८००), फेसबुक (२०,७६६) आणि यूट्यूब (३,८८२) या प्लॅटफॉर्म वरील सायबर गुन्ह्यांच्या १,१०,९२५ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. असेही सांगण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील जागरूक सायबर सैनिकांनी या विषयावर आपले योगदान दिले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र रिसर्च सेंटर तर्फे करण्यात येत आहे.
Leave a Reply