श्याम मानव यांची राजकीय करणी!

पुरोगामी आणि प्रगतीशील महाराष्ट्राने आजवर अंधश्रद्धेला कायम विरोध केला आहे. पण तरीही कधीकधी “मुठमारणे”, “भानामती” किंवा “करणी” करणे, सारखे प्रकार उघडकीस येत असतात. आणि त्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते उभे राहतात. ते या अंधश्रद्धेमागील कारणे सांगतात, सगळ्या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊन गैरसमज दूर करतात. पण… जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेच “राजकीय करणी” करायला लागतात, तेव्हा कोण काय करणार ?

आपली आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा सांभाळत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर बेछूट आरोप करण्यास पुढे येत असतील, तर त्या आरोपांकडे कसे आणि किती गांभीर्याने पहावे ? हा मला पडलेला प्रश्न आहे.
गेल्या ३४ वर्षापासून मी पत्रकारितेत आहे. या काळात राज्याचे राजकारण खूप जवळून पाहिले आहे. पण आज ज्या पद्धतीने श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अत्यंत गंभीर आरोपांची यादी वाचून दाखवली, तसा प्रकार कधीच पाहिला नव्हता.
राज्याच्या माजी गृहमंत्र्यालां, म्हणजे अनिल देशमुख यांना, ते गृहमंत्री असताना, विरोधी पक्षातील देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अशक्य वाटणारी गोष्ट करायला सांगितली गेली होती. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे, अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भयंकर तक्रारी, त्याही “अफिडेविट”, प्रतिज्ञापत्राद्वारे करण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणला गेला होता. असे श्याम मानव यांचे म्हणणे आहे.

त्यात किती सत्य आहे किंवा नाही हे या प्रकरणाशी जबाबदार मान्यवर ठरवतील. पण ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती श्याम मानव यांच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्याद्वारे बाहेर येते आणि अनिल देशमुख लगेचच ती माहिती खरी आहे, हे सांगण्यासाठी पुढे येतात. हे का घडले याचा मागोवा घेत असताना काही तासांपूर्वी घडलेली एक महत्त्वपूर्ण घटना लक्षात घेतली पाहिजे. केंद्रीय अन्वेषण विभागाने नुकताच, पुणे मोक्का कोर्टात एक धक्कादायक अहवाल सादर केल्याची माहिती समोर आली आहे. या अहवालामुळं माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रकरण आहे भाजप नेते गिरीश महाजनांवर यांच्यावर मोक्का लागला पाहिजे या देशमुख यांच्या दबावाचे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांना महाजनांवर मोक्का लावा अन्यथा कारवाई करू, अशी धमकी दिली होती. विजय पाटील आणि गिरीश महाजन प्रकरणात हा धमकीचा आरोप होता,असा धक्कादायक अहवाल सीबीआयने पुणे मोक्का कोर्टात सादर केला आहे. याविषयी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, गिरीष महाजन यांच्यावर खोट्या केसेस लागल्या पाहिजेत. यासाठी गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी दबाव टाकला होता. हे नसलेले गुन्हे दाखल करायला लावले. यांसंदर्भातले ऑडिओ, व्हिडीओ पुरावे मी स्वत: दिले होते. त्यावर सीबीआयकडे केस दाखल झाली. त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासहीत कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कशाप्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांना मोक्का लावणे, खोट्या केसेसमध्ये फसवणे याची मोडस ऑपरेंडी होती, हे आपण सर्वांनी नीट पाहिलं आहे. असे देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.
म्हणजे गिरीश महाजन प्रकरणाचा अहवाल सीबीआयने पुणे मोक्का कोर्टात सादर केल्यावर, आपल्या विरोधात कारवाई होणार, याची चाहूल लागताच, अनिल देशमुख यांनी श्याम मानव यांना पुढे करून देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आरोपाची तोफ डागली. जेणेकरून ते बचावात्मक पवित्रा घेतील. आपली अटक टळेल, असा त्यांचा प्रयत्न असावा.

पण मला दुःख एकाच गोष्टीचे होते, की ज्या सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत मंडळींकडून आम्हाला दूषित राजकारणाचे शुद्धीकरण व्हावे अशी अपेक्षा होती, त्याच मानव सरांसारख्या माणसाने या दूषित राजकारणाला अधिक प्रदूषित करण्यासाठी कधी छुपे तर कधी उघड प्रयत्न प्रयत्न करावे, ही महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची घोर शोकांतिका आहे.

शाम मानव यांनी फडणवीस यांच्यावर केलेले आरोप हा मानव यांच्या राजकीय भूमिकेचा भाग आहे. हे तीस वर्षांपूर्वी पत्रकार असलेल्या मानव सरांनी पत्रकार परिषदेत सांगितले नाही. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्याम मानव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाविकास आघाडीचा उघड उघड प्रचार केला होता. हे सारे जाणतात. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे महायुतीचे सरकार निवडून येऊ नये, यासाठी श्याम मानव यांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
त्यांचे सहकारी पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील, यांनी एका लेखात श्याम मानव यांच्या या राजकीय हालचालींची इत्यंभूत माहिती दिली आहे. ते लिहितात,
“विदर्भात प्रा.श्याम मानव यांनी प्रचाराच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाची मदत न घेता लोकांच्या बळावर सुमारे 36 जाहिरसभा घेऊन वातावरण ढवळून काढण्यात हातभार लावला.
लोणावळा येथे 9 आणि 10 जून या काळात “लोकसभा आढावा अन विधानसभा नियोजन” यावर सखोल चर्चा झाली, राज्यात 288 मतदार संघात किमान 500 जाहीर सभा घेण्याचा निर्धार करून कोणत्याही परिस्थितीत महायुती सत्तेत येणार नाही, असा निर्णय प्रा.श्याम मानव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. दोन दिवसात 100 वक्त्यांची फौज,100 राजकीय पदाधिकारी कार्यशाळा, सुसज्ज आयटी सेल,लोकशाही बचाव सनद, लोकांना भेडसावणाऱ्या निवडक प्रश्नांची पुस्तिका असे भरगच्च नियोजन लोक सहभागातून करण्याचे ठरले आहे.” असे या लेखात आवारे पाटील यांनी स्पष्टपणे म्हंटले आहे.
हे एवढे समजल्यावर माझ्या मनात प्रश्न उभा राहतो, की शाम मानव यांनी जर महाविकास आघाडीच्या बाजूने राजकीय भूमिका घेतली आहे, त्यासाठी प्रस्थापित राजकारण्यांकडून आर्थिक आणि अन्य प्रकारची मदत घेतल्याशिवाय हे प्रचंड काम ते एकटे करू शकत नाहीत. हे सर्वश्रृत असताना ते सामाजिक कार्यकर्ते असल्याचा मुखवटा घालून फडणवीसांच्या विरोधात का आरोप करत आहेत… ?
श्याम मानव थेट महाविकास आघाडीचे नेते म्हणून स्वतःची ओळख करून का देत नाहीत?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकूणच महाविकास आघाडीला राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना राजकारणाची, सत्तेची लालूच दाखवून या कार्यकर्त्यांची विश्वासार्हता कमी करायची आहे का ?

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *