राज्यात १९,२०० कोटींची गुंतवणूक; कॅपिटलँड डेटा सेंटरचे उद्घाटन

ठाणे: राज्यामध्ये डेटा सेंटरच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार असून, तब्बल १९ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक येत्या काळात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन आणि कॅपिटलँड इंडिया-इन्व्हेस्टमेंट लिमिटेड यांच्यात यासंबंधी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्राला देशातील एकूण डेटा सेंटर क्षमतेपैकी ७० टक्के क्षमता एकट्या महाराष्ट्रात उभी राहण्यास मदत होणार आहे.

नवी मुंबई येथे कॅपिटलँड डेटा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कॅपिटलँड इन्व्हेस्टमेंट आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांकडून ही गुंतवणूक केली जाईल. या उद्घाटन सोहळ्याला सिंगापूरचे उपपंतप्रधान गान किम योंग, सिंगापूरचे परिवहन मंत्री जेफरी सिओ, कॅपिटलँड इंडिया ट्रस्ट्सचे अध्यक्ष मनजीत खेतानी, कॅपिटलँड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव दासगुप्ता, मुख्यमंत्र्यांचे मुख्य गुंतवणूक सल्लागार गौतम वस्तूवे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

महारत्न-सिंगापूरमध्ये ३००० कोटींचा करार

याव्यतिरिक्त, महाराष्ट्र शासन आणि मेपलवूड इन्व्हेस्टमेंटस् प्रा. लि, सिंगापूर यांच्यातही ३००० कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. या करारामुळे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटी आणि इंडियन पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने उरण येथील जेएनपीए बिझनेस सेंटरमध्ये ग्रीन अँड डिजिटल मेरीटाइम कॉरिडॉर्स डिझाईनसाठी मदत मिळणार आहे. या कार्यक्रमाला जेएनपीएचे चेअरमन उमेश बापू, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी. क. रामचंद्रन हे उपस्थित होते.

नागपूरमध्ये ‘मेडिसीटी’ प्रकल्प

याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये ‘मेडिसीटी’ नावाचा एक महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प सुरू करण्याची घोषणाही केली. महाराष्ट्र शासन, मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस प्रा. लि. आणि टेमासेक यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत हा प्रकल्प उभारला जाईल. नागपूरला देशातील एक प्रमुख वैद्यकीय केंद्र बनवणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *