अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज सायंकाळी 7.30 वाजता आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल 2025 चा अंतिम सामना होणार आहे. यंदा आयपीएलला नवीन चॅम्पियन मिळणार आहे. कारण आत्तापर्यंत दोन्ही संघाने एकदाही आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेले नाही. त्यामुळे कोण जिंकणार, याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. मात्र, आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पाऊस खेळ खराब करू शकतो का आणि या सामन्याचा निकाल कधी येऊ शकतो, याबाबत काही प्रश्न क्रिकेट रसिकांमध्ये आहेत. त्यामुळे अहमदाबादच्या हवामानाकडे अधिक लक्ष असणार आहे.
चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी
चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे, अंतिम सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता फारच कमी आहे. हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार, 3 जून रोजी अहमदाबादमध्ये आकाश स्वच्छ राहणार असून पावसाची शक्यता फक्त 20 टक्के आहे. त्यामुळे सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय खेळवला जाऊ शकतो. जर आयपीएलच्या अंतिम सामन्यात पाऊस पडला, तर सामना अतिरिक्त दोन तासांसाठी वाढवला जाईल. दुसरीकडे, जर पावसामुळे 3 जून रोजी सामना झाला नाही तर 4 जून हा अंतिम सामन्यासाठी राखीव आहे. असे असूनही, जर 4 जून रोजी सामना झाला नाही, तर पंजाब किंग्जला आयपीएल 2025 चा विजेता घोषित केले जाऊ शकते, कारण लीग सामन्यांमध्ये पीबीकेएस आयपीएल पॉइंट टेबलमध्ये आरसीबीपेक्षा पुढे होता. दोन्ही संघांचे पॉइंट टेबलमध्ये 19-19 गुण आहेत, परंतु पंजाबचा नेट रन रेट बंगळुरूपेक्षा चांगला आहे, त्यामुळे रजत पाटीदारचा बंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे आणि श्रेयस अय्यरचा पंजाब पहिल्या स्थानावर आहे.
Leave a Reply