मुस्लिम समाजात शिक्षणाची गरज इतर कोणत्याही समाजापेक्षा अधिक आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नागपूरमध्ये आयोजित दीक्षांत समारंभात बोलताना त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. दिवसातून कितीही वेळा नमाज पठण करा, पण त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षणही घ्या. समाजात इंजिनीयर, डॉक्टर, आयएएस अधिकारी तयार झाले तरच विकास साधता येईल,असे त्यांनी स्पष्ट केले. गडकरी पुढे म्हणाले, माणूस जात, धर्म, पंथ, भाषा किंवा लिंग यामुळे मोठा होत नाही, तर त्याच्याकडे असलेल्या गुणांमुळे तो ओळखला जातो. म्हणून प्रत्येकाने आपले कौशल्य विकसित केले पाहिजे.
जो करेगा जाति की बात, उसको मारूंगा लात’: नितीन गडकरी
गडकरी यांनी त्यांच्या जुन्या घोषणेंचा उल्लेख करत स्पष्ट केले, मी सुरुवातीपासून म्हणत आलो आहे की, ‘जो करेगा जाति की बात, उसको मारूंगा लात.’ समाजसेवा हीच सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून मी कधीही जाती-धर्मावर आधारित चर्चा करत नाही. राजकारणात असलो तरी कोणतेही काम करताना मी या गोष्टीकडे लक्ष देत नाही. निवडणुकीत हरलो किंवा मंत्रीपद गमावले तरीही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. असे स्पष्ट करत त्यांनी आपल्या विचारसरणीवर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुस्लिम समाजाला शिक्षणाची विशेष गरज-नितीन गडकरी
या वेळी गडकरी यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळातील एक आठवण सांगितली. मी नागपूरमधील अंजुमन-ए-इस्लाम इन्स्टिट्यूटला इंजिनिअरिंग कॉलेज स्थापन करण्याची परवानगी दिली होती, कारण मला वाटत होते की मुस्लिम समाजाला शिक्षणाची विशेष गरज आहे, असे ते म्हणाले. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यांच्या प्रेरणेतून मुस्लिम समाजातील अनेक तरुणांनी शिक्षण घेऊन यश मिळवले आहे. आज अंजुमन-ए-इस्लामच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी इंजिनिअर झाले आहेत. अधिकाधिक मुस्लिम तरुणांनी शिक्षण घेतल्यास समाजाचा सर्वांगीण विकास होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Leave a Reply