मुंबई : मत्स्य व बंदरे विभागाचे मंत्री व भाजपा नेते नितेश राणे हे वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकतंच धाराशिवमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे शिवसेना (शिंदे) व भाजपात सारं काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळालं. पाठोपाठ त्या वक्तव्यामुळे राणे बंधूंमध्ये (नितेश व निलेश राणे) वादाची ठिणगी पडली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. फडणवीस यांनी नितेश राणे यांना या प्रकरणावरून समज दिली आहे. धाराशिवमधील एका कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी “राज्यात भाजपाचे सरकार असल्याचे लक्षात ठेवावे, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा”, असं वक्तव्य केलं होतं. त्यांचा रोख स्थानिक शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्यांना होता. त्यावरून शिंदे गटातील नेत्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. परिणामी शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी नितेश राणे यांना एक्सवर एक पोस्ट करून टीका केली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. आज (१०) जून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत नितेश राणे यांना जाहीरपणे समज दिली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते नितेश राणे यांना उद्देशून म्हणाले, “कोणाचाही बाप काढणं चुकीचं आहे. त्यामुळे मी संबंधित मंत्र्यांशी चर्चा देखील केली आहे. त्यांनी स्वतः याबाबत मला सांगितलं की माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. त्यावर मी त्यांना सांगितलं की तुमच्या मनात काहीही अर्थ असला तरी राजकारणात लोकांमध्ये त्या वक्तव्याचा काय अर्थ जातो (Perception) ते अधिक महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्याने अशा प्रकारे बोलणं योग्य नाही. ही बाबत त्यांनी (नितेश राणे) मान्य केली आहे”.
Leave a Reply