जळगाव: जळगावमधील प्रसिद्ध रील स्टार हितेश उर्फ विकी पाटील हत्या प्रकरणाने नवे धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला हत्येच्या आरोपावरून त्याच्या वडिलांवर संशय घेतला जात असताना, पोलीस तपासातून खून प्रत्यक्षात जेसीबी चालकाने केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
पोलीस तपासानुसार, विकी पाटील दारूच्या आहारी गेलेला होता. तो वारंवार आई-वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याने त्रस्त वडिलांनी जेसीबी चालक रवींद्र पाटील याला त्याच्या हत्येची सुपारी दिली होती.
सुपारी मिळाल्यानंतर रवींद्र पाटील याने विकीला दारू पाजली आणि शेतात नेले. त्यानंतर त्याचा गळफास लावून खून केला.
हत्या झाल्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून विकीला पुरण्यात आले. मुलाच्या हत्येनंतर विकीचे वडील विठ्ठल पाटील यांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्याआधी त्यांनी एक चिठ्ठी लिहून स्वतः मुलाचा खून केल्याचा उल्लेख केला होता. मात्र, प्रत्यक्षात खून त्यांनी न करता सुपारी देऊन करवून घेतल्याचे उघड झाले आहे.
पोलीस तपासात मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे जेसीबी चालक रवींद्र पाटीलसह विकीच्या काका आणि चुलत भावाला अटक करण्यात आली आहे. मात्र, हत्येसाठी नेमकी किती रक्कम दिली गेली, याचा अद्याप खुलासा झालेला नाही.
विकीच्या पत्नीने देखील हत्येप्रकरणी त्याच्या सासऱ्यांवर नव्हे, तर चुलत सासरे आणि दिरावर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणात अजूनही अनेक गोष्टी स्पष्ट होणे बाकी आहे. या धक्कादायक हत्याकांडामुळे संपूर्ण जळगाव हादरले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Leave a Reply