देशातील आघाडीच्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या जेएसडब्ल्यू स्टीलने महाराष्ट्रात साळव (जिल्हा – रत्नागिरी) येथे हरित पोलाद प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी कंपनीकडून ५०,००० ते ६०,००० कोटी रुपयांपर्यंत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली जाणार आहे. दरवर्षी १० दशलक्ष टन उत्पादनक्षमतेचा हा प्रकल्प मुख्यतः युरोपीय बाजारपेठेसाठी उभारण्यात येणार आहे. सध्या युरोपात ‘कार्बन बॉर्डर अॅडजस्टमेंट मेकॅनिझम’ लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे हा प्रकल्प धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शताब्दी वर्ष समारंभात बोलताना जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली. “या गुंतवणुकीची अंमलबजावणी पुढील तीन ते चार वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने केली जाईल. ग्रीन स्टील उत्पादनाद्वारे कार्बन उत्सर्जनात सुमारे ८० टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पात सुरुवातीला नैसर्गिक वायूवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. मात्र, भविष्यात तंत्रज्ञानात सुधारणा झाल्यानंतर हायड्रोजन आधारित उत्पादन पद्धतीकडे वळण्याची योजना आहे, असेही जिंदाल यांनी सांगितले.
स्टील आयातीवर लागू होणाऱ्या अँटी-डंपिंग शुल्काबाबतही जिंदाल यांनी मत व्यक्त केले. “स्टील मंत्रालयाने जास्त दराने शुल्क आकारण्याची शिफारस केली आहे. मात्र, याची सुरुवात वाणिज्य मंत्रालयाच्या प्रस्तावानुसारच होणे योग्य ठरेल. सरकार लवकरच या विषयावर निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
जेएसडब्ल्यू ग्रुप आता इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) क्षेत्रातही उतरायला सज्ज झाला असून, एमजी मोटर्ससोबतच्या कराराच्या पुढील टप्प्यात ‘जेएसडब्ल्यू कार्स’ अंतर्गत परवडणारी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त ईव्ही तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. “बॅटरी सेल वगळता, भारताकडे ईव्ही निर्मितीसाठी आवश्यक असणारे बहुतेक सर्व साहित्य उपलब्ध आहे. या अनुषंगाने आम्ही एका कोरियन कंपनीसोबत तांत्रिक भागीदारीसाठी चर्चा करत आहोत,” असेही जिंदाल यांनी सांगितले.
भारतातील ऑटो कंपोनंट उद्योग ईव्ही निर्मितीस पूरक असून, यामधून मोठ्या प्रमाणावर निर्यातदेखील केली जात आहे. “सध्याच्या स्थितीत भारताला जागतिक स्तरावर स्वतःचे ठोस स्थान निर्माण करता येऊ शकते. ही संधी देशासाठी फारच महत्त्वाची आहे,” असा विश्वास सज्जन जिंदाल यांनी व्यक्त केला. या भव्य गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात औद्योगिक प्रगतीला गती मिळेल, तसेच हरित तंत्रज्ञानाच्या दिशेने भारताची वाटचाल अधिक सशक्त होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Leave a Reply