केरळ होणार देशातील पहिलं ‘अत्यंत दारिद्र्य मुक्त राज्य’

तिरुअनंतपुरम – केरळ राज्य १ नोव्हेंबर २०२५ रोजी देशातील पहिलं “अत्यंत दारिद्र्य मुक्त राज्य” म्हणून घोषित होणार आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते राजधानी तिरुअनंतपुरममधील सेंट्रल स्टेडियम येथे हा ऐतिहासिक कार्यक्रम होणार असून, अभिनेते मोहनलाल, ममूटी आणि कमल हासन हे या सोहळ्याचे विशेष पाहुणे असतील. स्थानिक स्वराज्य मंत्री एम. बी. राजेश यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राजेश यांनी सांगितले की, २०२१ मध्ये नीती आयोगाच्या अहवालानुसार केरळमध्ये देशातील सर्वात कमी म्हणजे केवळ ०.७ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती. या छोट्या गटाला ओळखून त्यांच्यापर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने २०२१ मध्ये “अत्यंत दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम” सुरू केला. या अंतर्गत ६४,००६ कुटुंबांची अत्यंत गरीब म्हणून नोंद करण्यात आली.

या कुटुंबांसाठी शासनाने सूक्ष्म आराखडे तयार केले. अन्न, आरोग्य, निवारा आणि रोजगार यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. ३,९१३ कुटुंबांना घरं, १,३३८ कुटुंबांना जमीन, तर ५,६५१ कुटुंबांच्या घरांची दुरुस्ती करण्यात आली. ज्यांच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा ओळखपत्र नव्हते, अशा २१,२६३ जणांना आवश्यक कागदपत्रं उपलब्ध करून देण्यात आली.

राज्य सरकारने सर्व योजनांचा एकत्रित वापर करून, तसेच नव्या विशेष योजनांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य केल्याचं राजेश यांनी सांगितलं. प्रत्येक लाभार्थ्याचं घर जिओ-टॅग करून सर्व माहिती संग्रहीत करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रक्रियेचा सामाजिक लेखापरीक्षण (Social Audit) पूर्णत्वास आला आहे.

“ही सामूहिक यशोगाथा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, विरोधी पक्षीय प्रतिनिधी आणि सर्व समाजघटकांनी या प्रयत्नात समान सहभाग घेतला,” असं राजेश यांनी स्पष्ट केलं.

शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांच्या अध्यक्षतेखाली या सोहळ्याचं आयोजन केलं जाणार आहे. या घोषणेने केरळने पुन्हा एकदा सामाजिक न्याय आणि लोकाभिमुख शासनाच्या क्षेत्रात देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *