एक महान स्वातंत्र्यसैनिक, केरळचे माजी मुख्यमंत्री आणि गौरवशाली पुन्नप्र वायलार संघर्षातील एक नायक असलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड व्ही. एस. अच्युतानंदन यांच्या निधनाबद्दल अखिल भारतीय किसान सभा शोक व्यक्त करत आहे. त्यांचे वय १०१ वर्षे होते. ते २००६ ते २०११ अशी पाच वर्षे केरळचे मुख्यमंत्री होते तसेच ते केरळ विधानसभेत तीन वेळा विरोधी पक्ष नेते होते. ते सात वेळा आमदार म्हणून निवडून आले. या सर्व जबाबदाऱ्या पेलताना त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. ते पूर्वी माकपच्या पॉलिटब्युरोचे सदस्य आणि केरळ राज्य कमिटीचे सचिव होते.
वेलिक्काकाथु शंकरन अच्युतानंदन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९२३ रोजी अलाप्पुझाच्या पुन्नप्र गावात शंकरन आणि अक्कामा यांच्या पोटी झाला. ते ४ वर्षाचे असताना त्यांच्या आईचे आणि ११ वर्षाचे असताना वडीलांचे निधन झाले. यामुळे त्यांना ७वी नंतर शिक्षण सोडावे लागले. त्यांचे बालपण महामंदीच्या भयावह आर्थिक संकटात गेले. यामुळे व्हीएस यांच्या मनात या क्रूर साम्राज्यवादाच्या विरोधात तीव्र भावना निर्माण झाली. अलाप्पुझा हा त्रावणकोरमधील आधुनिक कामगार चळवळीचा केंद्रबिंदू होता.
१९४० मध्ये जेव्हा ते एस्पिनवॉल कंपनीत कामगार होते तेव्हा प्रगत सर्वहारा घटकांनी व्हीएस यांना कम्युनिस्ट पक्षात आणले. केरळमधील कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोत्कृष्ट संघटक कॉ. पी. कृष्ण पिल्ले यांनी व्हीएस यांच्यामधील प्रतिभा ओळखली आणि त्यांना प्रामुख्याने दलित आणि मागास जातीच्या शेतमजुरांना संघटित करण्यासाठी कुट्टनाड येथे पाठवण्यात आले. यावेळी त्यांनी मार्क्सवाद-लेनिनवादाचा ठोस उपयोग करून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दबलेल्या शेतमजुरांना आणि गरीब शेतकऱ्यांना जमीनदार आणि दमनकारी शासनसंस्थेविरुद्ध संघटित केले.
पुन्नप्र वायलार या युद्धोत्तर क्रांतिकारी उठावामध्ये कॉ. व्हीएस यांचा सहभाग सुप्रसिद्ध होता. स्वातंत्र्यानंतरच्या लढाऊ क्रांतिकारी कार्यामुळे त्यांना भांडवलदारी राज्य यंत्रणेच्या रोषाला सामोरे जावे लागले. पोलीस कोठडीत त्यांना सहन कराव्या लागलेल्या क्रूर छळामुळे ते कष्टकरी लोकांवर आणि विशेषतः ग्रामीण सर्वहारावर्गावर होणाऱ्या शासक वर्गाच्या हिंसाचाराबद्दल खूप संवेदनशील बनले. त्यांच्या राजकीय आयुष्यात ते नेहमीच राज्य यंत्रणेच्या हिंसाचाराचा लढाऊपणे प्रतिकार करत राहिले.
कॉ. व्हीएस १९५६ मध्ये अविभक्त कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीवर आणि १९५८ मध्ये राष्ट्रीय कौन्सिलवर निवडून गेले. १९६४ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय कौन्सिलच्या बैठकीतून सभात्याग करणाऱ्या आणि पुढे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करणाऱ्या ३२ सदस्यांपैकी ते शेवटचे जीवित सदस्य होते. या ३२ पैकी आणखी एक, तामिळनाडूचे कॉ. एन. शंकरय्या यांचे दीड वर्षापूर्वी वयाच्या १०१व्या वर्षी निधन झाले.
१९८० ते १९९१ पर्यंत कॉ. व्हीएस माकपच्या केरळ राज्य कमिटीचे सचिव होते. १९६४ मध्ये ते पक्षाच्या केंद्रीय कमिटीवर निवडून आले आणि १९८५ मध्ये ते पॉलिट ब्युरोचे सदस्य निवडले गेले. वयाच्या कारणामुळे २०२२ मध्ये ते केंद्रीय कमिटीचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवृत्त झाले.
कॉ. व्हीएस सात वेळा केरळ विधानसभेवर निवडून आले. त्यांनी तीन वेळा विरोधी पक्षनेते म्हणून पर्यावरण संरक्षण, लिंग समानता, पाणथळ जमीन संवर्धन, परिचारिकांना चांगले वेतन, ट्रान्सजेंडर हक्क आणि फ्री सॉफ्टवेअर यासारख्या सार्वजनिक बाबींवर प्रभावी काम केले. २००६ ते २०११ पर्यंत ते केरळचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळात श्रमिकांच्या कल्याणासाठी अनेक कायदेविषयक आणि प्रशासकीय उपाययोजना केल्या गेल्या.
कॉ. व्हीएस हे क्रांतिकारी शेतकरी चळवळीशी नैसर्गिकपणे जोडले गेले होते. त्यांच्या लेखन आणि भाषणांमध्ये नववसाहतवादाद्वारे शेतकरी कसे लुटले जातात याचे तपशीलवार वर्णन केले होते. नवउदारवादी सुधारणा सुरू झाल्या तेव्हा त्यांनी केरळमधील कामगार आणि शेतकरी वर्गाचे नेतृत्व केले. “मुक्त व्यापार” यासह शेतीमधील उदारीकरणाच्या धोरणांवर त्यांनी केलेली कडक टीका केरळच्या राजकीय अर्थव्यवस्थेत खूप परिणामकारक ठरली. पर्यावरणीय प्रश्नांशी सखोल संबंध असलेले कॉ. व्हीएस यांनी निसर्गाचे बाजारीकरण करण्याच्या कॉर्पोरेट लोभाकडे सातत्याने लक्ष वेधले.
केरळच्या मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या कार्यकाळात (२००६-११) कृषी राजकीय अर्थव्यवस्थेत सर्जनशील हस्तक्षेप दिसून आले. काँग्रेस आणि भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारांनी हिंसकपणे राबवलेल्या उदारीकरणाच्या धोरणांमुळे गंभीर कृषी संकटे आणि शेतकरी आत्महत्या घडल्या. कॉ. व्हीएस यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारने शेतकरी कर्जमुक्ती आयोग सुरू केला जो शेतकऱ्यांना मोठा आधार देणारा ठरला. हे संपूर्ण देशासाठी एक अग्रगण्य मॉडेल ठरले. त्यांच्या कार्यकाळात देशातील सर्वोत्तम आधारभूत किमतीसह भात लागवडीसाठी अनुकूल धोरणे देखील पाहायला मिळाली. प्रशासकीय उपाययोजना आणि त्यांच्या राजकीय वैचारिक संघर्षांनी नवउदारवादाची दिवाळखोरी उघडकीस आणली. सहकारी संस्थांचे आजीवन संघटक म्हणून, कॉ. व्हीएस यांनी त्यांच्या शेवटच्या वर्षांत शेतकऱ्यांच्या कॉर्पोरेट शोषणाविरुद्ध एक आधार म्हणून सहकारी संस्थांची पुनर्रचना करण्याची गरज उत्कटतेने मांडली.
त्यांच्या निधनाने, क्रांतिकारी शेतकरी आणि शेतमजूर चळवळीने आपला ध्रुवतारा गमावला आहे. कॉ. व्हीएस यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे हे निःसंशयपणे एक अत्यंत कठीण काम असेल.
अखिल भारतीय किसान सभा कॉ. व्हीएस यांच्या सन्मानार्थ आपला लाल झेंडा झुकवत आहे आणि त्यांच्या पत्नी के. वासुमती, त्यांची मुलगी व्ही.व्ही. आशा आणि मुलगा व्ही.ए. अरुण कुमार आणि त्यांच्या नातवंडांचे सांत्वन करत आहे.
Leave a Reply