कुर्डू मुरुम उत्खनन वाद गाजला, पालकमंत्री गोरे म्हणाले, उत्खनन बेकायदेशीर

कुर्डूवाडी (सोलापूर) : कुर्डू गावातील मुरुम उत्खननप्रकरण अधिकच चिघळले असून शुक्रवारी संपूर्ण गावाने शंभर टक्के बंद पाळला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी सरपंच अप्पारावसाहेब ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्याने वातावरण तापले आहे.दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मिळालेल्या अहवालानुसार कुर्डूतील मुरुम उत्खनन हे बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कुर्डू परिसरात बेकायदेशीर मुरुम उत्खनन सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्याचदरम्यान, अप्पारावसाहेब ढाणे यांनी खासदार मोहिते-पाटील यांच्यावर “खुनांची सिरियल” असल्याचा आरोप करत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. या वक्तव्यामुळे गावात व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. यावर प्रत्युत्तर देताना खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी कोणावरही थेट आरोप केलेले नसल्याचे सांगत, “पुराव्याशी संबंधित मुद्दे मांडले आहेत. माईकवर बोलल्या जाणाऱ्या वक्तव्यांमुळे आता प्रकरण कोर्टात जाणार आहे,” असे स्पष्ट केले.

याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रशिक्षणार्थी आयएएस अंजना कृष्णा डी. एस. यांच्यात झालेल्या संवादानंतर राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे. शुक्रवारी झालेल्या बंदमध्ये ग्रामस्थांनी एकजूट दाखवली असून गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. परिणामी, कुर्डू मुरुम उत्खनन प्रकरण आता केवळ स्थानिक न राहता राजकीय पातळीवर गाजत असून पुढील घडामोडींवर राज्याचे लक्ष लागले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *