दिवाळीत लालपरीला लाभला सुवर्णकाळ; पुणे विभाग अव्वल, 301 कोटींचे विक्रमी उत्पन्न

दिवाळीच्या सुट्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) यंदा तब्बल 301 कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले असून, या कामगिरीत पुणे विभागाने अव्वल स्थान पटकावले आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली असून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

18 ते 27 ऑक्टोबर या दिवाळी कालावधीत एसटीला दररोज सरासरी 30 कोटींच्या आसपास उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे 27 ऑक्टोबर, म्हणजेच परतीच्या प्रवासाच्या दिवशी एसटीने 39 कोटी 75 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत वर्षातील सर्वोच्च विक्रम नोंदवला.

राज्यातील 31 विभागांपैकी पुणे विभागाने 20 कोटी 47 लाख, धुळेने 15 कोटी 60 लाख, तर नाशिकने 15 कोटी 41 लाख रुपये उत्पन्न मिळवले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा महामंडळाने 37 कोटी रुपयांची वाढ नोंदवली आहे.

तथापि, काही विभागांची कामगिरी चिंताजनक राहिली. सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आणि धाराशिव विभागांनी अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळवले नाही. यामुळे एकूण उत्पन्नावर काही प्रमाणात विपरीत परिणाम झाल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांत अवकाळी पाऊस आणि पूरस्थितीमुळे एसटीला 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे दिवाळी हंगामात उत्पन्न वाढण्याची अपेक्षा होती. ऑक्टोबर महिन्यासाठी 1049 कोटी रुपयांचे उत्पन्नाचे लक्ष ठेवण्यात आले होते, मात्र काहीच दिवस हे लक्ष्य पूर्ण झाले.

एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून घरी न जाता सेवा बजावली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ‘लालपरी’ने दिवाळीत ‘लक्ष्मी’चे आगमन घडवले, असे मंत्री सरनाईक म्हणाले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *