लातूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे एका चार वर्षांच्या निरागस मुलीची तिच्या जन्मदात्या पित्यानेच चॉकलेटसाठी केलेल्या हट्टावरून गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात आणि संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पित्याचे नाव बालाजी बाबु राठोड (वय ३६) असून, तो व्यसनाच्या पूर्णपणे आहारी गेला होता. त्याला ४ वर्षांची आरुषी बालाजी राठोड नावाची मुलगी होती. रविवारी (२९ जून, २०२५) दुपारी आरुषीने वडिलांकडे चॉकलेटसाठी हट्ट धरला. व्यसनात असलेल्या बालाजीला याचा प्रचंड राग आला. रागाच्या भरात त्याने आपल्याच पोटच्या मुलीचा साडीने गळा आवळला. चिमुकली गतप्राण होईपर्यंत त्याने साडीचा फास सोडला नाही.
आरुषीची आई, वर्षा राठोड, घरी आल्यावर त्यांना ही धक्कादायक घटना समजली. त्यांनी तात्काळ उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.पोलिसांनी तपास सुरू केला असता, हा गुन्हा बालाजीनेच केल्याचे समोर आले. पोलिसांचे पथक आपल्या मागावर असल्याची खबर लागताच बालाजी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. उदगीर ग्रामीण पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे आरुषीच्या आईला आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. आरुषीची आई वर्षा राठोड यांनी पोलिसांकडे सातत्याने मागणी केली आहे की, “माझ्या लेकराला त्याने मारून टाकले आहे, त्याला फाशीची शिक्षा द्या, त्याला सोडू नका.”
आरुषीचे चुलते राजू राठोड यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. “बालाजीने आम्हाला खूप त्रास दिला आहे. तो वेगळे राहत होता आणि आमच्याकडे घराची आणि जमिनीची वाटणी मागत होता. तो नेहमी बायकोशी भांडण करायचा आणि आम्हाला मारण्याची धमकी द्यायचा. आज त्याने मुलीलाच मारून टाकले आहे.” असे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण भीमा तांडा गाव हादरले आहे.
बालाजीच्या व्यसनामुळे त्याचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते, असे पोलिसांनी सांगितले. त्याची पत्नी वर्षा त्याला सोडून वडिलांकडे राहत होती, पण आरुषी त्याच्यासोबतच होती. ९ जून रोजी बालाजी तिला जबरदस्तीने माहेराहून घेऊन आला होता. वर्षा राठोड यांच्या तक्रारीवरून बालाजी राठोड याच्याविरोधात गुस्नं. 417/2025 कलम 103(1) भारतीय न्याय संहीता 2023नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.या अमानुष कृत्याबद्दल समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.


Leave a Reply