लातूर मनपा आयुक्तांनी उचललं टोकाचं पाऊल,महाराष्ट्रातील बड्या IAS अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उशिरा रात्री उघडकीस आली आहे. त्यांच्या घरात त्यांनी डोक्यात गोळी झाडली असून, सुदैवाने ते बचावले आहेत. सध्या लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. ही घटना इतकी अचानक घडली की संपूर्ण लातूर हादरून गेलं आहे. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून घरातील सदस्यांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेतली. लगेचच त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गोळी डोक्याच्या उजव्या बाजूने आरपार गेली असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सध्या ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.

आयुक्तांच्या या टोकाच्या निर्णयामागे नक्की कारण काय?

घटनास्थळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, वरिष्ठ पोलीस अधिकारी, तसेच मनपातील वरिष्ठ अधिकारी तातडीने पोहोचले. भाजप नेत्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि इतर माजी नगरसेवकांनीही हॉस्पिटलमध्ये भेट दिली. या आत्महत्येच्या प्रयत्नामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बाबासाहेब मनोहरे हे घरच्यांसोबत नेहमीप्रमाणे जेवले आणि नंतर स्वतःच्या खोलीत गेले होते. काही वेळातच गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांच्या मानसिक अवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत काय तणाव होता? कोणती वैयक्तिक व्यावसायिक अडचण होती का?

बाबासाहेब मनोहरे यांनी धाराशिव, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नांदेडमध्ये अतिरिक्त आयुक्त आणि नंतर लातूर मनपाचे आयुक्त म्हणून ते कार्यरत आहेत. स्पष्टवक्तेपणा आणि कठोर निर्णयांसाठी ते ओळखले जात. मात्र, इतकं टोकाचं पाऊल उचलण्यामागे काय कारण असेल, हा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *