मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे अनेक बालकांचे मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर एफडीएने राज्यातील औषध विक्रेत्यांना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधे विकू नयेत, असा कठोर आदेश जारी केला आहे. एफडीएचे राज्य औषध नियंत्रण अधिकारी डॉ. श्रीनिवास शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कफ सिरपमध्ये ‘डायइथिलीन ग्लायकॉल’ हे घातक रसायन आढळल्याने बालकांच्या मृत्यूंची प्रकरणे समोर आली आहेत. हे रसायन शरीरासाठी अत्यंत विषारी असून, त्याचे सेवन झाल्यास यकृत आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या घटकाचे अंश आढळलेल्या औषधांचा तात्काळ नाश करण्याचे निर्देशही दिले गेले आहेत.
‘कॉफिल्ड्स सिरप’ नावाचे औषध मध्य प्रदेशात दिल्यानंतर अनेक बालकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्येही सावध झाली आहेत. तामिळनाडूमधील कांचिपुरम जिल्ह्यातील श्रीराम फार्मास्युटिकल्स या औषधनिर्मिती कारखान्यातून हे सिरप तयार होत असल्याचे उघड झाले आहे. तपास पथकाने या कारखान्यावर छापा टाकून तो सील केला आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात या सिरपमुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांची संख्या २० वर पोहोचली असून, अजून नऊ मुलांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
एफडीएने राज्यातील सर्व औषध विक्रेत्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणत्याही प्रकारचे कफ सिरप विक्रीस ठेवू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याशिवाय, संशयास्पद औषधांचे नमुने तपासणीसाठी त्वरित प्रयोगशाळेकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.गुजरात आणि तेलंगणातही अशा सिरपच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, बालकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी देशभर औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
Leave a Reply