महाराष्ट्र सीईटी सेलचा मोठा निर्णय : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतून १५१ विद्यार्थी बाद

मुंबई : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मोठा वळण आला असून १५१ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. महाराष्ट्र सीईटी सेलने (Maha CET Cell) तिसऱ्या फेरीतील एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेदरम्यान बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपावरून ही कारवाई केली आहे. पात्र उमेदवारांची नवीन यादी गुरुवारी जाहीर होणार आहे.

ही कारवाई टाईम्स ऑफ इंडियाच्या १३ ऑक्टोबरच्या अहवालानंतर करण्यात आली. त्या अहवालात म्हटलं होतं की, इतर राज्यांतील काही विद्यार्थ्यांनी तिकडच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जागा निश्चित केल्यानंतरही महाराष्ट्रात प्रवेशासाठी अर्ज दाखल केले आहेत. या प्रकारातून बाहेरील राज्यातील विद्यार्थी राज्यातील जागा अडवतात, असा प्रकार समोर आला होता.

या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने दस्तऐवज पडताळणी मोहिम राबवली. या मोहिमेत १५२ विद्यार्थ्यांची कागदपत्रे संशयास्पद किंवा चुकीची आढळली. फक्त एका विद्यार्थ्यानेच मूळ कागदपत्रे सादर करून पात्रता सिद्ध केली आहे.

सीईटी आयुक्त दिलीप सर्देसाई यांनी सांगितले की, “या सर्व १५१ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे.” अधिकाऱ्यांनी सांगितले की तपासादरम्यान गुणपत्रिकांमध्ये तफावत, संशयास्पद रहिवासी दाखले आणि बनावट संपर्क क्रमांक यासारख्या अनेक अनियमितता आढळल्या.

सीईटी सेलने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) अधिपत्याखालील मेडिकल कौन्सेलिंग कमिटी (MCC) कडे या विद्यार्थ्यांची ओळख आणि शैक्षणिक नोंदी तपासण्याची विनंती केली आहे. तथापि, या प्रकरणी कायदेशीर कारवाई होणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

दरम्यान, इतर काही राज्यांनी अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी अधिक कठोर प्रवेश पद्धती अवलंबली आहे. महाराष्ट्रातही पुढील प्रवेश फेरीसाठी अशा प्रकारच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा विचार केला जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *